प्रकरण सहा - देवी इश्तारला गिल्गमेशचा नकार व स्वर्गातील रेड्याचा धुमाकूळ

इश्तारची ईशकबाजी

एंकिडू आणि गिल्गमेश दोघे उरुकमधे  सुखरुप परतले आणि थकलेभागले आपापल्या महालात गेले.
गिल्गमेशने आपली शस्त्रास्त्रे लख्ख पुसून चकचकीत केली. केस खळाखळा धुवून स्वच्छ केले, उटणेबिटणे लावून एक दीर्घ शाही स्नान केले. सोनेरी काठाचे पांढरेशुभ्र कपडे, सुंदर केशरी उपरणं, कमरेला मोरपंखी रंगाचा रेशमी शेला, त्यात खेचलेली तलवार, मस्तकी नीलमण्याने सुशोभित मुकुट - अशा एकूण वेषात तो महालाच्या सज्जात येवून उभा राहिला. त्याच्या बलदंडबाहूंवर सोनेरी केस रुळत होते, मागून येणार्‍या सूर्यकिरणांमुळे तो दिवसा अवतरलेला अलौकिक ताराच वाटत होता.

प्रेमदेवता इश्तारने याच एक्झॅक्ट-क्षणी गिल्गमेशला पाहिले आणि पाहताक्षणीच ती त्याच्यावर आसक्त झाली. तिला तात्काळ गिल्गमेशसह प्रणयाराधन करायची इच्छा झाली. तिने ताबडतोब त्याच्याबरोबर विवाह करायचा निश्चय केला. इश्तार गिल्गमेशाच्या सज्जात अवतरली आणि म्हणाली, "भो गिल्गमेश:, मी तुझा पराक्रम पाहिला, तू माझा प्रियकर होशीला का रे, पुरुषोत्तमा?" पहिला हा सभ्य प्रश्न विचारल्‍यावर बाईंची गाडी मूळ मुद्दावर येते. उगाच नंतर गोंधळ नको -
पुरुषरूपी वृक्षाला स्त्रीसाठी येणारे फळ, तू मला देशील का? कल्ला. बाई कामज्वराने पेटल्या होत्या. पुढे आपल्या प्रपोजलला विशेष भाव मिळावा म्हणून इश्तार गिल्गमेशाला विविध प्रलोभने दाखविते. त्यांची यादी खालीलप्रमाणे - 
१. नीलमण्याचा रत्नजडीत व सोनेरी रथ. घोड्यांबरोबर, विविध वरुणदेवता त्यारथाला जुंपल्या असतील. (अनेक वरुणदेवता आहेत, टीमच असेल त्यांची)
२. सिडारचा सुगंध असलेले घर, त्यात येताच विविध राजकुमार,राजे,देव गिल्गमेशचे चरणचुंबन करतील.
३. सगळ्या टेकड्या व पठारावरील पिकाचा महसूल गिल्गमेशचा
४. गिल्गमेशच्या सगळ्या शेळ्यामेंढ्यांना कायम जुळे होतील. (आयव्हीएफ लॅब होती का काय बाईंची)
५. मिसलेनिअस .

गिल्गमेश तिला म्हणाला - ते सगळं ठीके मॅडम, पण माझ्या संकटसमयी तुम्ही माझी साथ द्याल का? तुझ्याशी लग्न करुन माझा काय फायदा?
इश्तारचे रेप्युटेशन काही खास नव्हते, त्याच संदर्भाने गिल्गमेश तिची प्रचंड निंदानालस्ती करतो. बरीचशी निंदा विनोदी आहे , ती खालीलप्रमाणे -
१. तू कोळशाचं असं पातेलं आहेस की, जे थंडी पडताच, उष्णता देणं बंद करतं.
२. तू घराचं असं मागच दारच आहेस की, जे जोरात वारं आलं की हमखास उघडतं.
३. तू असा बंगला आहेस की, जो नेमका पाहुणे आल्यवरच कोसळतो.
४. तू अशी पखाल आहेस की, जी मालकाची पाठ सोलून काढते.
५. तू असा मुकुट आहेस की, जो ऐनवेळेला तुटतो
६. तू अशी चुनखडी आहेस की, जी भिंतीचा पायाच झिजवते.
७. तू अशी चप्पल आहेस की, जी घालणार्‍याला कायम चावते.
अशी एकूण उपमात्मक प्रस्तावना झाल्यावर तो तिच्या जुन्या लग्न-कम-लफड्यांची एकवार उजळणी करतो. 
तो म्हणतो, तू कुणावर मनापासून प्रेम केलंस गं देवी? तुझा एकतरी प्रियकर आज शांतसुखी जीवन व्यतित करत आहे का? ठहरो, मै तुम्हारी याद्दाश ताज़ी करही देता हूं -
१. तामूझ - तुझा कोवळा प्रियकर, तुझ्यामुळे तो दर पानगळीला मरतो आणि वसंतात परत जन्मतो. आम्ही अजूनही त्याच्यासाठी आक्रोश करतो.
२. ठिपके असलेला पक्षी - सुंदर ठिपके असलेला पक्षी, छान उडायचा. तू त्याचा पंख तोडलास. बागेत बसून, अजूनही तो बिचारा, माझा पंख, माझा पंख असे करुण आवाजात गातरडत असतो.
३. सिंह - सर्व प्राण्यात बलशाली अशा या राजालापण काय मिळालं तुझ्या प्रेमाच्या मोबदल्यात? त्याच्यासाठी तू सात खड्डे खणलेस आणि अडकला बिचारा त्यात.
इश्तार प्रेमदेवता असल्याने तिच्याकडे रुपबिप बदलायची क्षमता असेलच, तिचाच वापर करुन ती सिंहाशी सिंहीण, पक्ष्याशी पक्षीण, यक्षाशी यक्षीण, रीक्षाशी रीक्षीण होऊन प्रणयाराधन करत असणार. उगाच ७X वगैरे शंका घेवू नका.
४. एक लढवय्या - त्याला घाण्याला जुंपलस, त्यालाच पाणी गढूळ करायला लावतेस आणि तेच त्याला प्यायला लावतेस. त्याची आई अजून रडते संततधार.
५. मेंढपाळप्रमुख - या मित्राने तर तुला स्वत:ची तान्ही मुले अर्पण केली, पण तू त्याला लांडगा बनवलंस. आता त्याच्या कळपातली पोरंच त्याला हूरर्र हूरर्र करतात, त्याचा स्वत:चा कुत्राच त्याला कचाकचा चावतो.
६. इशुल्लानु (देव अनुचा माळी) - किती गोड नाव आहे खरंतर. एशॉल्लोनू केले तर बंगालीच वाटते. हा तर संतमाणूस. मालकाची(अनुदेव) पोर म्हणून तो रोज तुला पोत्यानी खजूर आणायचा. तू त्याला म्हणालीस, इशुल्लानु बघू मला तुझा जोर, तुझे जे काय आहे ते माझ्याआत घाल. इशुल्लानु म्हणाला, बेबी, मला खायची भ्रांत नाही, असले कृत्य मी करणार नाही. तू त्याला ठेंगू माणूस,कोळी,बेडूक किंवा चिचूंद्री यापैकी काहीतरी करुन टाकलेस. 

मला पक्के माहित आहे की, मी तुला होकार दिला तर, या सर्वांपेक्षा माझी वेगळी काही गत होणार नाही. तू क्रमांक एकची वापिलिपी बाई आहेस. तुला माझ्याविषयी प्रेम नाही तर निव्वळ वासना, वखवख वाटते आहे. तेव्हा थॅंक्स बट नो थॅंक्स. 
इश्तार प्रचंड म्हणजे, यू जस्स्ट कॅन्ट इमॅजिन अशी चिडली आणि तात्काळ निघून गेली.

लोकहो, भानावर या. तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करु देवू एच्छितो की आपण इव्हा ग्रीन निवडली आहे, वरचा संवाद (किंवा कृत्ये) ईव्हा ग्रीनला मनात घेवून कल्पायचे विसरला असलात तर अजूनही वेळ गेली नाही. या भूमिकेला दुसरे कोणीही न्याय देवू शकत नाही. नोप्स, चक्.

गिल्गमेशमधे झालेला हा बदल लक्षणीय आहे. पूर्वी हा मनुष्य, दिसले होळकर की उठले दांडेकर या विचारसरणीचा होता. पण एंकिडूबरोबर केलेल्या द्वंद्वानंतर व हुंबाबाशी केलेल्या लढाईनंतर हा जरा बदलला. साक्षात रतिदेवी इश्तारला नाकरायलाची हिंमत बाळगू लागला. गिल्गमेशला खरं सभ्य भाषेत नकार देता आला असता. पण सभ्य भाषा हा त्याचा फोर्टे नव्हता. किंबहुना भाषा हाच त्याचा फोर्टे नव्हता.

मुलांनी दुधाला, पुरुषानी चहाला, बायकांनी कुंकवाला आणि सुमेरीयन लोकांनी इश्तारला नाही म्हणू नये. बॉलिवूडच्या बी ग्रेड सिनेमात, व्हिलनच्या भावाकडे (छेड काढणार्‍या) दुर्लक्ष न करता त्याला कानफटात लगावली तर हिरोच्या बहिणीची काय गत होते ते आपण सर्व जाणताच.
*

इश्तार सूडभावनेने पेटली

उरुकमधूने इश्तार तडक स्वर्गात देवाधिदेव अनुच्या कक्षात गेली. आईबाबांसमोर अक्षरश: ढसाढसा रडली. हमसून हमसून. तिने दोघांना घडला वृत्तांत सागितला आणि म्हणाली गिल्गमेशने कारण नसताना माझा एवढा मोठा अपमान केला, माझ्या सगळ्या दुष्कृत्यांची आठवण करुन द्यायची काही गरज होती का? तो मला म्हणाला, तू एक क्रूर दुर्गंधच आहेस जणू.
मला आत्ताच्या आत्ता स्वर्गातला रेडा हवा आहे, त्या रेड्याला उरुकमधे गिल्गमेशच्या घरात घुसून मारताना, मला बघायचे आहे. अनुदेवाने तिला समजावयचा प्रयत्न केला की - बाळ, आत्ता तू खूप रागात आहेस. थोडा वेळ जावूदे, मग मागाहून बोलू आपण.  काहीही प्रमाणाबाहेर आवडले किंवा नावडले तर, २४ तास जावून द्यावेत मग त्याविषयी परत विचार करावा. शिवाय तूच त्याला असे बोलायला भरीस पाडलेस की नाही, सांग बरं?
इश्तार काहीही ऐकूने घ्यायच्या मनस्थितीत नव्हती, ती तेव्हा पाकिस्तानात असती तर तिने सगळे हातपम्प उखडून टाकले असते. तिने वडिलांना इशारा दिला - 
देवाधिदेव, तुम्ही मला स्वर्गातील रेडा दिला नाही तर मी पाताळाचा दरवाजा एकाच प्रहारात तोडून टाकेन. मग सगळे मृतात्मे बाहेर येतील, बाहेरचं सगळं खातील, जिवंत लोक आणि मृतात्मे एकत्र होतील, प्रचंड गोंधळ. बलागान एकदम. करु असं ? करु?
अनुदेवापुढे काही पर्याय नव्हता, ते म्हणाले - तुला माहित आहेच की, हा रेडा जर उरुकमधे गेला, तर तिथे सात वर्ष दुष्काळ पडेल. तू लोकांसाठी सात वर्ष पुरेल एवढं धान्य, गुरांसाठी सात वर्ष पुरेल एवढा चारा याची तजवीज केली आहेस का? 
इश्तार म्हणते - ऑल टेकन केअर, डॅड. लेट्स गो, याल्ला, याल्ला .
अनुदेव रेड्याची वेसण इश्तारच्या हातात देतात. 

इश्तार म्हणते, आत तू बघच गिल्ग्या.
*

रेड्याचा धुमाकूळ

उरुकच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यावर इश्तारने रेड्याचे दावे सोडले आणि म्हणाली - छू. रेड्याचे प्रताप खालीलप्रमाणे -
१. रेड्याच्या पहिल्या उच्छ्वासाने, मोठा खड्डा पडला आणि उरुकचे शंभर सैनिक त्यात पडून गारद. एका फुरफुरीतच शंभर.
२. दुसर्‍या फुरफुरीत, दोनशे गायब, लिनीअर प्रोग्रेशन.
३. आता रेडा आत शिरुन पूर्ण उरुकभर सैरवैरा धावू लागला. जनता हवालदिल.
४. एव्हाना एंकिडूला बाहेर काहीतरी गडबड चालू आहे याची कल्पना आली होती. तो बाहेर आला तोवर रेडा तिसर्‍यांदा फुरफुरला, त्याने हा भलामोठा खड्डा पडला आणि त्यात एंकिडू पडला.
पण एंकिडू, बाजीगर होता, त्याने अशक्य चापल्य दाखवत, बाहेर उडी मारली ती थेट रेड्यासमोरच - अनपेक्षितरित्या (रेड्याच्या व इश्तारच्या) एंकिडूने रेड्याची दोन्ही शिंग पकडली आणि त्याला मागे रेटले.
रेड्याने त्याच्या शेपटाचा एक जोरदार फटका देवूने एंकिडूला शिंगावरुन खाली पाडले. एंकिडूने परत हुशारी दाखवत रेड्याचे शेपूट घट्ट धरुन त्याला रोखले आणि जोरात ओरडला - "गिल्गमेश.." पण रेडा काही शांत होत नव्हता, तो त्याच्यामागे एंकिडूला फरफटत नेत होता. एव्हाना गिल्गमेश आलाच होता, त्याने योग्य संधी बघून रेड्याच्या समोर उडी मारली आणि त्याच्या शिंगांच्यामधे तलवारीने एकच जोरदार घाव घातला. त्याला अक्षरश: उभा चिरला. रेड्याच्या डोक्यातून रक्ताचे कारंजे वाहू लागले त्यात गिल्गमेश आणि एंकिडू न्हावून निघाले आणि उरुकवासीयांनी एकच जल्लोष केला.
दोघांनी मिळून रेड्याचे हृदय, काढले आणि शमाशदेवाला त्याचा नैवेद्य दाखवला. नंतर त्यांनी शमाशला वाकून नमन केले. (आपल्यासारखे नैवेद्य दाखवणे म्हणजे नंतर आपणच खाणे वगैरे काही उल्लेख नाही) नंतर दोघे हातात हात घालून शांतपणे विश्रांती घेत उरुकच्या मुख्य चौकात बसले.
*

इश्तारचा शाप व रेड्याचे शवविच्छेदन

उरुकच्या तटबंदीवर उभे राहून इश्तारने रेड्याचा नि:पात बघितला. ती प्रचंड चिडली व हताश झाली. तिने गिल्गमेशला शाप दिला - स्वर्गातील रेड्याची हत्या करुन तू माझा परत अपमान तर केला आहेसच, पण कु:कर्मही केले आहेस, तुझ्या वाट्याला अपरिमीत दु:ख येईल.
गिल्गमेशपुढे दुसरा काही मार्ग तरी होता का? वनविभागातले लोक पिंजरा आणून बेशुद्धीचे इंजेक्शन देवून मग बिबट्याला पकडतात, तसं काही करणं शक्य तरी होतं का बिचार्‍याला? उगाच शाप.
इश्तारने अशी शापवाणी उच्चारलेली ऐकून एंकिडू पेटला, त्याने तिच्या डोळ्यादेखत रेड्याचा उजवी तंगडी फाडून काढली आणि आकाशात तिच्या दिशेने भिरकावली. शिवाय गरजला - मी तुझ्यापर्यंत पोहचू शकलो असतो तर मी या रेड्याची जी गत केली ती तुझीपण केली असती रांडे, सध्या मी तुझ्यासाठी आकाशात मखर बनवतो - रेड्याच्या आतड्यांचं. कसला माज. 
इश्तार रडवेली झाली, तिने आपल्या मंदिरातल्या सगळ्या कुमारीकांना बोलावले.  सगळे महिलामंडळ रेड्याच्या मांडीभोवती गोल बसले, आणि सगळ्या जोरजोरात रडू लागल्या. मला इथे बिचार्‍या शमातची दया येते, एंकिडूवर प्रेम केलं,आणि इश्तार तर तिची आद्यदेवी. मधल्यामधे सॅंडविच. काय करणार बिचारी, नशीब एकेकीचं.
रेड्याच्या मांडलिकांची ही अशी शोकसभा भरली असताना तिकडे गिल्गमेश एकदम राजाची ड्युटी करायला लागला. त्याने राज्यातले सगळे कारागीर, लघुउद्योजक यांना उरल्यासुरल्या रेड्यापाशी बोलावलं आणि काय यातून शोपीस, शस्त्रबिस्त्र बनवता येतील ते बघा म्हणाला. मेक इन उरुक. त्यांनी बरंच कायकाय बनवलं. मेन आयटम म्हणजे, रेड्याची भलीथोरली शिंगं. ती नीलरत्नजडीत होती. शिंगातून १५०० बादल्या तरी पांढरा रस्सा निघाला तो गिल्गमेशने लुगालबंदाला नैवेद्य म्हणून दाखवला. पोकळ रत्नजडीत शिंग आपल्या महालात पलंगाच्यावर लटकवली.
नंतर गिल्गमेश आणि एंकिडूने युफ्रेटीसमधे कोपरापासून मनसोक्त हात धुतले, एकमेकाची गळाभेट घेतली. मजा आली यार, वुई शुड डू धिस मोअर ऑफन असे म्हणाले आणि उरुकच्या रस्त्यातून मिरवणूकीत सामील होत होत घरी गेले. मग गिल्गमेशच्या महालात रात्री जंगी पार्टी झाली. 

एंकिडूला त्या रात्री एक स्वप्न पडले आणि त्याला दरदरुन घाम फुटला.
***

१. मिसलेनिअस - या शब्दाचे स्पेलिंग केवढे अवघड आहे आणि ५०% वेळेला फक्त लोक Misc. लिहितात. (मी तर १००%) या छपरी शब्दाचे स्पेलिंग बदलून कायमचे Misc. का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस कोणीतरी कोणालातरी पाठवणे गरजेचे आहे. 
२. आतापर्यंत बरीचशी गोष्ट मी आठवेल तशी लिहिली आहे पण इथे मात्र एखादी ओळ राहून जावू नये म्हणून संदर्भ घेऊन लिहिले आहे. या उपमा एवढ्या छान आहेत की, तुम्ही त्यांपासून वंचित राहू नये असे मला मनापासून वाटते. शिवाय निंदानालस्ती (स्वत:ची सोडून) म्हणजे माझा फारच आवडता विषय. कुणी निंदा, कुणी वंदा, ते पसरविणे हाच आमचा धंदा.
३. काही पुस्तकात इश्तार, इशुल्लानुला त्याचा हात तिच्या योनीत घालायला सांगते, काही ठिकाणी संदिग्ध - तुझं काय आहे ते, माझ्याकडे जे काय आहे त्यात घाल. हवं ते करा, माझ्या नाकात तुझं बोट घातलस तरी चालेल. It's entirely upto you Ishullanu, you see.
४. वासनापिडीतलिंगपिसाट
५. मला अवतार सिनेमा असाच प्रचंड आवडला होता, मग आठवड्याभराने सामान्य वाटला.
६. बलागान - गडबडगोंधळ.
७. याल्ला याल्ला -  चला पटपट.

0 comments: