प्रकरण अकरा - उत्नापिष्टीम व गिल्गमेश यांची चर्चा आणि गिल्गमेशचा परतीचा प्रवास

उत्नापिष्टीम का अमर आहे?

गिल्गमेश वैतागून उत्नापिष्टीमला म्हणतो - शमाश, सिदुरी, उर्शानबी, तू हे सगळं मला सांगता पण एक विसरता की, तू स्वत: मनुष्य जन्माला येवून अमर झालासच ना? मंग लेका? तेव्हा कुठे गेला होता, राधासुता तुझा धर्म? तू तर एकूणात माझ्यासारखाच दिसत आहेस, एका योद्ध्याला दुसरा सहज ओळखू शकतो, तू असे काय शौर्य गाजवलेस जे मी गाजवू शकत नाही?
उत्नापिष्टीम समजुतीच्या सुरात म्हणतो - गिल्गमेश बाळ, चिडू नकोस, मी तुला एक गुपित सांगतो, जे फक्त देवांनाच माहित आहे. गोष्ट खूप जुनी आहे. 
युफ्रेटीसकाठी शुर्पाक नावाचे प्राचीन समृद्ध शहर होतं. सर्व देवांनाही हे शहर आवडायचं. काही अनाकलनीय कारणांमुळे देवांनी पृथ्वीवर प्रलय आणायचे ठरविले. देवांची सभा भरली, अनु, एन्लिल, युद्धदेव निनृता, एंकी हे सर्व तिथे उपस्थित होते. (आपली इश्तार आयटम नव्हती) तिथे बहुमताने प्रलयाचा निर्णय घेण्यात आला. एंकीला हे अजिबात मान्य नव्हते पण करणार काय बिचारा. कुठल्याही देवाने प्रलयाविशयी आपल्या भक्तांना काही सांगू नये म्हणून गॅग ऑर्डर काढण्यात आली. 
प्रलयाची तारीख पक्की करण्यात आली पण इकडे एंकीचे मन त्याला खात होतं, मग त्याने आयडिया काढली - प्रलयाबद्दल माणसांना सांगयचे नाही असा अनुचा आदेश होता. उत्नापिष्टीमच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गवत होते, जणू गवताची भिंतच. एक दिवस उत्नापिष्टीम आजूबाजूला आहे असे बघून एंकी तिथे गेला आणि म्हणाला - अरे गवता, मोठा प्रलय येणार आहे, त्यात सर्व काही नष्ट होवून जाईल. तू एक एक मोठे जहाज तयार कर, तुझा जीव आणि नेसते वस्त्र सोडून बरोबर काही सामान घेवू नकोस. सगळे प्राणीपक्षीवनस्पति एकेक जोडी त्या नावेत घे. गवता, तू लोकांना सांग माझ्यावर एन्लिल देवाची अवकृपा झाली आहे म्हणून मी काही इथे राहू शकणार नाही, मी एंकी देवाची कृपा आहे अशा ठिकाणी दक्षिणेकडे चाललो आहे.
उत्नापिष्टीम हुशार होता त्याला कळले, गवता बोले, उत्ना लागे. मग उत्नापिष्टीमने तसे तंतोतंत केले, सांगितले त्या मापाचे जहाज बांधले. एवढे अजस्त्र जहाज त्याच्या एकट्याच्याने बांधणे काही शक्य नव्हते त्यासाठी त्याने कामगारांना  बोलावले. त्यांना मस्त मटणदारु दिली रोज, त्यांनी पण मनापासून काम केले. सात दिवसात जहाज बांधून तय्यार. तोवर उत्नापिष्टीमने त्याच्या घरातल्यांना बाहेर कुठं कुठं पाठवून सगळे प्राणीपक्षी, विविध वनस्पतिच्या बिया असं आणून ठेवलं होतं. जहाज तयार झाल्यावर त्यात घरातले सगळे आणि प्राणीपक्षी, सगळ्यांना कोंबलं. 
शमाशने उघड उघड प्रलय कधी येणार याची घोषणी केली. (शमाश पहिल्यापासूनच देवांच्यतला लूज कॅनन आहे वाटतं). शमाशने आकाशवाणी करताक्षणीच उत्नापिष्टीम स्वत: जहाजात चढला आणि सगळे दरवाजे बंद करुन टाकले.
पहाटे प्रचंड काळे ढग आकाशात दिसू लागले. वीजांचा कडकडाट सुरु झाला. न भूतो, न भविष्यति असा पाऊस पडू लागला. सागराच्या लाटा आकाशाएवढ्या उंचीपर्यंत पोचल्या. मोठे मोठे पर्वतसुद्धा पाण्यात बुडाले. सगळे भयभीषण वातावरणा बघून ॲक्च्युअलमधे देव सुद्धा  घाबरले. आपण हे काय केले, हे पाणी स्वर्गात तर पोचणार नाही ना या शंकेने स्वर्गात एका खोपच्यात कुत्र्यासारखे खेटून-खेटून बसले. इश्तार रडू लागली, हे मी काय केलं म्हणू लागली. (यावरुन असे दिसते की प्रलयालापण ही बयाच कारणीभूत आहे, किती किडे असावेत एखाद्याच्यात). सहा दिवस, सात रात्री असा सगळा प्रलय सुरु होता. इतके दिवस उत्नापिष्टीम काही न खातापिता, न झोपता कौशल्याने जहाज हाकत होता. सातव्या दिवशी समुद्र शांत झाला, पाउस थांबला, ढग गायब झाले. मग उत्नापिष्टीमने निसीर पर्वतापाशी जहाज पार्क केलं, आणि एक एक पक्षी बाहेर सोडले - पारवा, कावळा ईत्यादी. त्यापैकी कोणीच परत नाही आले, त्यांना जमीन सापडली. मग उत्नापिष्टीमने जहाजातून उतरायच्या आधी देवांची पूजाबिजा केली, बकरं कापलं एक, हिरेमाणकं अर्पण केले त्यांना. असा सगळा नैवेद्य बघून देव लगेच अन्नाभोवती घोंघावणार्‍या माशांसारखे त्याच्याभोवती जमले. इश्तार म्हणाली - या रे या सगळे या, एन्लिल सोडून सगळे या, एन्लिलमुळेच एवढा राडा झाला आहे, त्यानेच प्रलय आणला. (तरी एन्लिल भाऊ बरका हिचा). 
एन्लिलला हा प्रकार कळला तेव्हा तो जबरदस्त चिडला - हा मनुष्य कसा काय वाचला या प्रलयातून? त्याने आधीच नाव कशी बांधली? 
निनृता म्हणाला - नक्कीच एंकीने उत्नपिष्टीमला टीप दिली असेल, तो स्वत:ला फार शहाणा समजतो. देवांचा दरबार भरला आणि त्यात एन्लिलने एंकीला झाल्या प्रकाराचा जाब विचारला.  
सेंट ऑफ वूमनमधे अल पचिनोने शाळेत जसे घणाणाती भाषण केले तसेच देवसभेत एंकीनेपण केले, त्याचे सार असे - सर्वप्रथम मी हे सांगू ईच्छितो की, मी गवताला प्रलय येणार ते सांगितले, मी कुठलाही नियम मोडला नाहीये. आणि उत्नापिष्टीमने आयुष्यात एकही पाप केले नाही त्यामुळेच तो वाचला, नाहीतर अशा भीषण प्रलयात ज्याची तुम्हालाही भिती वाटली, तो बचावला असता का? अरे आपण देव आहोत यार, आपण खरेतर क्षमाशील असले पाहिजे. लोकांची पापं मिटवायला आपण लोकांचा संहार केला, हे शोभते का आपल्याला. आपण हे विसरलो की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी. असंच काय काय उदात्त.
एंकीचे भाषण ऐकून एन्लिलच्या डोळ्यात पाणी आले - त्याला सगळं पटलं. तो दरबारातून उठून तडक उत्नाच्या जहाजावर गेला आणि उत्नाला सपत्निक डेकवर बोलावल. दोघांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना अमर केलं. दॅट इझी. मग एन्लिल म्हणाला, उत्ना तू आणि तुझी पत्नी, आता अमर आहात, स्वर्गातील नद्या जिथे धरतीवरच्या समुद्राला मिळतात तेथे तुम्ही आजपासून वास करा.

उत्नापिष्टीमचे गोष्ट सांगून झाले. त्यानी आजूबाजूच्या शांततेवर एक विजयी कटाक्ष टाकला. गिल्गमेश अजून सगळी गोष्ट पचवत होता. लोकहो, आपण ही गोष्ट अनेकदा ऐकली आहे, पण लक्षात घ्या, ही गोष्ट ऐकणारा गिल्गमेश हा पहिलाच मानव होता त्यामुळे त्याने भारावून जाणं साहजिक आहे.


थोडा एक-दोन ओळींचा पॉज झाल्यावर उत्नाने गिल्गमेशला विचारले - तुला अमर करण्यासाठी अशी देवांची सभा भरणार नाही. पण चल, तुला अमर करायची माझी जबाबदारी. तू सहा दिवस-सात रात्र न झोपता इथे बसून दाखव. मी जहाजात बसलो होतो तसं. जर तू जागं राहू शकलास तर तू अमर होशील. आहे कबूल? 
गिल्गमेश एकदम आनंदी झाला, ज्याच्यासाठी एवढी मरमर केली ते मिळणार एकदाचं. तो म्हणाला - त्यात काय एवढं, मी एकदम सहजरित्या जागून दाखवेन.
*

गिल्गमेशची परिक्षा

उत्नापिष्टीमने ठरवलेली ही अमरत्वाची चाचणी मला प्रचंड आवडते. माझा एक मित्र आहे. त्याचा दुसरा एक मित्र - तो सर्पमित्र आहे. (मी नव्हे). तर माझा हा सर्पमित्रमित्र, याला साप पकडणे हे एवढे भारी साहस वाटायचे की त्याने ठरवले आपण पण सर्पमित्र व्हायचे. त्याने त्याच्या सर्पमित्राकडे घोषा लावला, मलापण साप पकडायला शिकव म्हणून. सर्पमित्रभाऊ हुशार आहे, त्याने सांगून पाहिले की, अरे तुला नाही जमणार, मी काय आज ओळखतो का तुला. पण हा गडी ऐकेचना, तो म्हणाला - हे बघ मला साप पकडायला शिकवले नाहेस तर आजपासून आपली दोस्ती बंद. बंद म्हणजे बंद, दर सोमवारी बंद तसे. सर्पमित्राने सापांबरोबर असे प्रॉब्लेमसुद्धा पूर्वी हाताळले असावेत. तो म्हणाला - बरं बाबा, उद्यापासून तुझे ट्रेनिंग सुरु. असे कर, उद्या घरातील एक पाल पकड आणि एका प्लास्टीकच्या पिशवीत ठेव. ती पिशवी खिशात ठेवून मला आणून दाखव. त्याच्यानंतर माझ्या मित्राने सर्पमित्राला सापांबद्दल कधीच काही विचारले नाही.
बॅक टू गिल्गमेश.
गिल्गमेश वज्रासनात बसला. पाच मिनीटाच्या आत त्याचे डोळे मिटले. पोपट. उत्नापिष्टीमची बायको म्हणाली, अहो उठवा त्याला बिचार्‍याला, आपण सांगू तुझा डोळा लागला. आता थोडावेळ नीट पड आणि आल्यावाटेने परत जा कसा. उत्ना म्हणाला - नाही नाही, माणसं आता लबाड झाली आहेत कलियुगात. आपण उठवलं तर तो म्हणेल - झाले की सहा दिवस, सात रात्री. त्यापेक्षा तू अस कर, एक ताजा ताजा ब्रेड बनव आणि त्याच्या डोक्यावर ठेव. रोज एक ब्रेड आपण त्याच्या डोक्यावर ठेवू. उत्नापत्निने ही आज्ञा शिरसावंद्य मानून ब्रेड करायला घेतले. रोज सकाळी एक ताजा ताजा ब्रेड गिल्गमेशच्या डोक्यावर ठेवायचा.. सहा दिवस, सात रात्री झाल्या. पहिल्या दिवशी ठेवलेला ब्रेड पूर्ण कोरडा पडला असतो. (आपल्याला दुकानदाराने फसवून शिळा ब्रेड दिल्यावर कसा मिळतो तसा), दुसर्‍या दिवशीचा ब्रेडपण कोरडा, पण त्यातल्या त्यात जरा बरा,,,,सहाव्या दिवशीचा चांगला होता अजून.
सातव्या दिवशी सकाळी, उत्नापिष्टीमने गिल्गमेशला उठवले. गिल्गमेश म्हणाला - अर्रे, आत्ताच दोन क्षणांपुरते फक्त डोळे मिटले होते मी झोपलो नव्हतो. तेवढ्यात तुला वाटलं झोपलो आणि तू मला हात लावलास. उत्नाने बायकोला, बघ म्हणालो होतो किनई, मी कसला भारीय असा लूक दिला. उत्ना गिल्गमेशला म्हणाला - तुझ्या डोक्यावरचे ब्रेड मोज, पहिला कसला चूराचूरा झालाय, दुसरा खराब झालाय, तिसर्‍याला बुरशी आलीय,,,फक्त सहावा अजून ताजा वाटतो आहे तसा. तुम्ही पूर्ण सहा दिवस, सात रात्री झोपला होता मालक.
गिल्गमेश रडू लागला - आता काय करु मी, आता मी मरणार, मला अजून एक चान्स मिळेल का प्लीज, नाहीतर मीपण एंकिडूसारखा मरणार.
उत्नापिष्टीमला आता गिल्गमेशचं रडगाणं बोर झालं होतं. त्याने गिल्गमेशकडे दुर्लक्ष केले आणि तो उर्शानबीला म्हणाला - उर्शानबी, उर्शानबी, उर्शानबी, व्हाय उर्शानबी व्हाय? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुला आधीच सांगितले होते ना, तू सोडून अजून कोणीही मृत्यूचा समुद्र पार करायला, तुझ्या बोटीतून येता कामा नये? मग का आणलस तू गिल्गमेशला? आता तुझी ही भंगार बोट घे आणि चालता हो, माझ्या घरी परत दिसता कामा नयेस तू मला. गेटावूट. पण जायच्या आधी एक काम कर तू बरोबर जो गिल्गमेशरुपी गलिच्छावतार घेवून आलास, त्याला जवळच्या नदीवर घेवून जा. त्याला चांगली खसखसून अंघोळ घाल, त्याच्या त्वचेवरचे सगळे घाणीचे थर निघून जावूदेत. त्याचे केस खळाखळा धू. छान कोवळ्या मक्याच्या कणसातल्या भुर्‍याभुर्‍या तुर्‍यांसारखे दिसायला पाहिजेत ते. मग छान नवीन हेअर बॅंड लाव त्याला, स्वच्छ कपडे घाल त्याला. एकदम राजबिंडा करूनच घेवून जा त्याला परत.
ही हाईट आहे. तुम्हाला फायर केल्यावर - अरे एक मिनीट हं, जायच्या आधी सगळ्या टीममेंबरच्या कोडसाठी जेयुनिट लिहून जा बरका, असे सांगितले तर कसे वाटेल? उर्शानबीला बिचार्‍याला तसेच वाटले असावे, पण तो सपोर्टींग रोलमधे असल्याकारणाने व गोष्ट लिहिणार्‍या कामगारांकडे मोजक्याच विटा असल्याने उर्शानबीच्या भावनांची दखल घेवून त्याच्यावर एकही ओळ लिहिण्यात आली नाहीये.
उर्शानबीने गिल्गमेशला एकदम घासूनपुसून स्वच्छ केलं आणि, ॲक्च्युअली माझ्या डोक्यातून जात नाहीये. गिल्गमेशलाच अंघोळ करायला सांगयचं ना, उर्शानबीला कशाला? गिल्गमेश काय पाळलेला कुत्रा आहे का दुसर्‍याने अंघोळ घालायला. कदाचित ते शिळे ब्रेड खावून गिल्गमेशचे पोट बिघडलं असेल त्यामुळे अंगात त्राण नसेल. असो.
*

फुल ना फुलाची पाकळी

स्वच्छ गिल्गमेश व पिडीत उर्शानबी नावेत बसून प्रवास सुरु करणार तेवढ्यात उत्नापत्नीने त्यांना थांबायला सांगितले. ती उत्नापिष्टीमला म्हणाली - उत्नू, हा गिल्गमेश तुला भेटायला किती प्रयत्न करून केवढे कष्ट घेवून आला. माशू पर्वत पार करणं, मरणाच्या समुद्रातून हातांनी नाव वल्हवणं, म्हणजे काय खाऊ नव्हे. त्याला जाताना आपण काहीतरी छोटीतरी भेट दिलीच पाहिजे. 
उत्नापिष्टीम पाघळला. तो गिल्गमेशला म्हणाला - बाळा, एवढ्या लांब कष्ट घेवून आलास मी तुला एक भेट देतो. देवांचे एक गुपित तुला सांगतो. (उत्नाकडे गुपितांचा साठाच होता, च्यायला.)  लक्ष देवून ऐक. समुद्रतळाशी बाभळीसदृश एक काटेरी वनस्पती उगवते. गुलाबाचे काटे कसे टोचतात तसे या वनस्पतीचे काटेपण टोचतात. त्या वनस्पतीला जो खाईल तो परत तरुण होतो. हाय का, अमरत्व नाही तर नेक्स्ट बेस्ट थिंग.

गिल्गमेश थोडा खूश होतो, तो आणि उर्शानबी लगेच प्रयाण करतात. निघतान गिल्गमेश मोठे दगड बरोबर घेतो. समुद्राच्या मधोमध नाव आल्यावर गिल्गमेश पायाला ते दगड बांधून समुद्रात उडी मारतो. क्षणार्धात तो समुद्रतळाशी पोचतो. तिथे थोडे हुडकल्यावर त्याला लगेच अशी वनस्पती मिळते. तो पायाचे दगड त्या वनस्पतिच्याच काट्यांनीच तोडतो आणि परत वर नावेत येतो. एकदम आनंदाने उर्शानबीला म्हणतो - उर्शा लेका, मी हा पाला खाणार आणि परत तरुण होणार. हा पाला आपण उरुकला घेवून जावू आणि योग्य वेळी मी तो खाणार. येस्स. मग मला सगळे लोक, म्हातारपणी तरुण झालेला माणूस म्हणून ओळखतील. किती सुंदर वाक्य आहे ना गिल्गमेशचे. उपमा नाही, अलंकार नाही, निरागस एकदम - म्हातारपणी तरुण झालेला माणूस. असे दहादा उर्शानबीला सांगून झाल्यावर ते प्रवास परत सुरु करतात. लवकरच समुद्रकिनारी पोचतात. आणि पुढे पायी निघतात. पूर्वीप्रमाणेच २० योजने झाल्यावर खावून घेतात, ३० योजने झाल्यावर दोघे रात्रीचा मुक्काम ठोकतात. बघा लोकहो, जन पळभर म्हणतील हाय हाय, एंकिडू गेला उर्शानबी आला.
गिल्गमेशला जवळच एक झरा दिसतो आणि तो त्यात अंघोळ करायचे ठरवतो, स्वत:हून. हो उर्शानबी नाही घालणार. कधीपण अशा मालकाबरोबर काम करावे. काय तो उत्नापिष्टीम, दुसर्‍याला अंघोळ घाल म्हणे. गिल्गमेश सगळे कपडे काढून अंघोळीसाठी झर्‍याच्या पाण्यात उतरतो. तेवढ्यात त्या वनस्पतीच्या सुगंधाने आकर्षित होवून फस्सकन एक अजगर येतं आणि ती वनस्पती घेवून जातं.
सॅड.

बेकार.


वंगाळ.

गिल्गमेशच्या डोळ्यातून अश्रू येतात. उर्शानबीचा हात हातात घेवून तो रडू लागतो - सगळं व्यर्थ उर्शानबी, सगळंसगळं व्यर्थ रे. किती कष्ट सोसले मी गेल्या काही दिवसात. अरे लुगालबंदचा मुलगा मी, कुत्र्याच मांस पांघरलं, वेड्यासारखा अंधारातून चाललो, मृत्यूसमुद्र हाताने वल्हवला, कशासाठी हा सगळा अट्टाहास, जे छोटं काही दिव्य हाती लागलं तेही त्या क्रूर अजगराने पळवलं. असे म्हणून खूप रडला माझा गिल्गमेश.
*

समाप्त

उर्शानबी आणि गिल्गमेश वेगळ्या वाटेने उरुकला परत आले. उरुकच्या हद्दीत प्रवेश केल्यावर गिल्गमेशच्या मुद्रेवर प्रसन्न भाव आले. मन प्रफुल्लित झाले. तो उर्शानबीला म्हणाला. अरे उर्शानबी - हे बघ माझं उरुक. ही भव्य तटबंदी दिसते आहे का? बघ हात लावून, हे दगड नाहीत मित्रा, विटांची तटबंदी आहे ही. जगात सर्वश्रेष्ठ, अभेद्य तटबंदी. उरुकमधे एक तृतीयांश जागेत शहर वसले आहे, एक तृतीयांश जागेत बागबगीचे, उर्वरीत जागा मोकळी आहे. ते बघ, ते तिथे इश्तारचे सुंदर देवूळ, बघ कसा नयनरम्य परीसर आहे. पाहिलं आहेस, कधी असलं सुंदर शहर? आणि तो बघ माझ्या प्रिय एंकिडूचा पुतळा.
चल मुख्यद्वारातून आत जावू. उरुकनरेश परत आला आहे.

गिल्गमेश, गिल्गमेश, गिल्गमेश
निन्सुनपुत्र, शमाशगोत्र, 
उरुकनरेश

गिल्गमेश, गिल्गमेश, गिल्गमेश
लुगालपुत्र, एंकिडूमित्र,
उरुकनरेश

इथे परत आपला लॉंगवाईड शॉट - पाठमोरे गिल्गमेश-उर्शानबी, समोर भव्य उत्तुंग तटबंदीचं उरुक, त्यात मधोमध एंकिडूचा पुतळा.

***
०. मला घणाघाती शब्द आवडत नाही.  हिंसक आहे. हिंसक असण्याबद्दल आक्षेप नाही. घणाणाती भाषण म्हणजे शब्द घंटानादासारखे कानावर आदळत आहेत असे वाटते - त्यातून पुढे काहीतरी चांगलेच होईल असा आशावाद आहे.
वाचकांना फालतू वाटू शकते, पण you've come till last chapter so that's the least of your problem. 
१. अतिगलिच्छ बालीश विचार - उवा खूश.
२. आज इतक्या वर्षांनंतरही मानवी प्रवृत्ती बदलली नाही, मी ४ वाजता अभ्यासाला उठून ४.०५ ला झोपायचो, ५:३० ला आईने उठवलं की हेच म्हणायचो - दोन क्षणांपुरते फक्त डोळे मिटले होते मी, झोपलो नव्हतो, तुला काय वाटलं, झोपलो का काय?
३. आमचे गणिताचे सर एकदा चिडले, त्यांना राग आवरेना, सावळ्या रंगाचे ते सर रागाने लाल झाले आणि म्हणाले - तुमच्यातला एकालाही एवढे साधे गणित जमत नाही, गेट आउट. असे म्हणले आणि स्वत:च वर्गाबाहेर गेले. मग आम्हाला जाम हसायाला आहे. मग ते परत आत आले. परत आत आल्यावर त्यांनी सगळ्यांना लय धुतला.

0 comments: