घडाभर तेल

गिल्गमेशची गोष्ट मला खूप पूर्वीपासून आवडते. ती पूर्ण अशी मराठीत कुठे वाचायला उपलब्ध नाहीये. दोन-चार लेख हिंदी विकीवर आहेत. म्हणून मी माझा मसाला घालून ही गोष्ट इथे उद्धृत करत आहे. लोकांना ती मराठीत वाचायला मिळावी असा काही एकमेव उद्देश नाहीये. मला काही आवडले की त्याच्यावर लिहावेसे वाटते. गिल्गमेश वर्षानुवर्षे आवडतो, पण टायमाचे वांदे असल्याकारणाने लिहिणे जमले नव्हते. (शिवाय आंग्लाळलेल्या मराठीचे संवर्धन व प्रसार हाही एक उद्देश आहेच.)

गोष्ट एकदम सरळसोट आहे. तशा जुन्या सगळ्याच गोष्टी सरळसोट असतात. सरळसोट म्हणजे सपक नव्हे; समजायला सोपी, त्यात उगाच टाईम लूप वगैरे नाहीत. पुराणे, जुनी महाकाव्ये वगैरे वाचताना आपण परीकथा वाचतो तशी वाचावीत आणि त्यांचा लुफ़्त घ्यावा अशी आमची भूमिका आहे. उगाच त्यांना इतिहास समजून खोलात विश्लेषण करून बोर मारू नये. अर्थात मी मनुष्यप्राणी असल्याने क्रमांक एकचा दांभिक आहे. लिहिण्याच्या ओघात मी स्वत:च असे विश्लेषण करेन. झुप्पे.
*

एकच गोष्ट दोन वाचकांना आवडू शकते, पण दोघांच्या मनात ती वेगवेगळ्या पद्धतीने चितारली गेलेली असू शकते. जेव्हा गोष्ट दोघांच्या मनात/डोक्यात एकाच पद्धतीने चितारली जाते, तेव्हा तिच्याविषयी बोलायला प्रचंड मजा येते. जाणीवपूर्वक असे व्हावे, म्हणून आम्ही लहानपणी प्रयत्न करायचो. 

वाचताना उगाच गुंतागुंतीचे वाटते आहे, पण अतिफालतू आहे. चला मुलांनो, स्मरणरंजन करून विशद करू या. 

दिवे गेल्यावर गाण्याच्या भेंड्या, श्लोक, पाढे वगैरे म्हणणे आपल्या बापाच्याने, आईच्याने आणि बहिणीच्याने कधी जमले नाही. बहिणीला आणि मला तर दिवे असतानाही एकत्र नीट श्लोक्स म्हणणे कधी जमले नाही - रामरक्षेच्या पुस्तकावर पडलेल्या रक्ताच्या डागांची शपथ. 

दिवे गेल्यावर आम्ही एखादी गोष्ट घ्यायचो आणि त्याच्यावर सिनेमा काढायचाय असे ठरवून एकेका व्यक्तिरेखेसाठी नट शोधायचो. लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला एका पात्रासाठी एक नट मान्य झाल्यावरच पुढची व्यक्तिरेखा. सगळे मेन लीड ठरले, की मग अरे, या प्रसंगात काय मजा येईल, वगैरे टाईमपास. कधी कधी बाहेरची गोष्ट असल्याने अवघड जायचे. के आणि जेर्डाचे(खरे गेर्डा असावे) एक वंशपरंपरागत आलेले पुस्तक होते आमच्याकडे - म्हणजे आईचे होते, ते तिने जपून ठेवून ताईला दिले, ताईने मला दिले, मी देवाला देऊन टाकले. हरवले. आम्हांला या के आणि जेर्डासाठी योग्य बालकलाकार मिळाले नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या मुलांनाच हे रोल दिले. आणि जादूगार म्हणून निळू फुले. एव्हाना वाचकांना मुद्दा कळून अजीर्ण झाले असेल. तरी असू दे.

आता गारंबीचा बापू सगळ्यांना आवडतो. (ज्यांना आवडत नाही त्यांनी जरा सरकून बसा, आयुष्य म्हणजे काय शेवटी? ॲडजस्टमेंटच ना?)

तर बापूमधील पात्रांसाठी आपण एकदा मंडळी ठरवली की मग गोष्ट अजून बहरेल.

बापू - रवींद्र मंकणी किंवा घाणेकर, अण्णा खोत - मोहन आगाशे, मावशी - सुलभा देशपांडे, बापूची आई - रीमा लागू, विठ्ठल - सुहास भालेराव किंवा जयंत सावरकर, दिनू - मोहन गोखले, सपाट बापू - कुलदीप पवार. राधा कोण यावर एकमत झालेले नाही गेली १५-२० वर्षे.(महासेक्सी + महासोज्ज्वळ कॉम्बिनेशन पाहिजे.)

बापू रागावून मावशीकडे येतो, तो भाग आता परत वाचा. काय मजा येईल बघा. शिवाय आपल्याला काही खराच सिनेमा काढायचा नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या काळातील नटमंडळीपण एकत्र काम करू शकतात.

असो. हे विषयांतर खूपच लांबले आहे, पण ये तो सिर्फ झाकी है, असली लांबड बाकी है.
*

गिल्गमेशची गोष्ट खूप आदिम आहे. व्यक्तिरेखा जास्त रंगवल्या वगैरे नाहीत, पण कथा जबरी आहे. गिल्गमेशविषयी कारकुनी लेव्हलची माहिती विकीवर मिळेलच. त्याविषयी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून थोडक्यातच.

गिल्गमेश हा प्राचीन मेसोपोटेमिआतला राजा होता. (आजचे इराक, सिरिया वगैरे - अग्गं बाई.) त्याची ही गोष्ट - Epic of Gligamesh - सांगणा‍र्‍या बारा टॅबलेट आहेत - आपण  विटा किंवा मृद्लेख म्हणू शकतो. या विटा अशुरबनिपालच्या ग्रंथालयात एकोणिसाव्या शतकात सापडल्या. बारावा लेख इतर अकरा लेखांशी सुसंगत नाहीये, त्यामुळे त्याचा या ब्लॉगच्या अभ्यासक्रमात समावेश केला नाहीये. इतिहासातल्या प्रश्नाचे हे उत्तर संपवून आपण गोष्टीकडेच जाऊ थेट.

तर भाईयों और बहनों, गोष्ट रंगतदार व्हायला आधी खालची पात्रांची यादी वाचा. प्रत्येक पात्रासाठी तुम्ही तुमच्या मनात कोण्या नटास कल्पावे हे सांगितले आहे. तशीच कल्पना करा, तरच लक्षात राहतील नावे. यात रहस्य काही नाही. त्यामुळे सगळ्या पात्रांची नावे आधीच टाकल्याने काही बिघडत नाही. (गोष्ट परदेशी असल्याने लोकपण हॉलिवूडचे आहेत.)

गिल्गमेश - ख्रिस हेम्सवर्थ. (थोर सिनेमातला थोर.)
उरुकचा राजा. महाबलशाली.

एंकिडू - ड्वेन जॉन्सन. (रॉक हो.) खरेतर, एंकिडू हा गिल्गमेशच्या उंचीचा किंवा थोडासा बुटका आहे, पण आपण सिनेमॅटीक लिबर्टी घेऊ.
गिल्गमेशचा परममित्र.

निन्सुन - ॲंजेलिना जोली आपली.
गिल्गमेशची आई, एक छाडमाड देवच आहे तीपण. सूर्यभक्त.

शमात - गेमा आर्थरटन.
एंकिडूबरोबर छान वागून व प्रणय करून त्याला माणसात आणणारी गणिका (किंवा अप्सरा). दोन-चार इंटिमेट सीन द्यायला लागतील, बरं का गेमाबाई.

इश्तार - ईव्हा ग्रीन.
मेसोपोटेमिअन लोकांची रतिदेवी, लय सेक्साडपंथी असते. थोडी वाईटपण आहे.

शमाश - वादच नाही, लिआम नेसन.
सूर्यदेव, गिल्गमेशचं कुलदैवत.

अनु - सर ॲंथनी हॉपकिन्स.
देवांचा राजा.

अरुरु - केट ब्लॅंचेट.
सर्जनाची देवी, एंकिडूला मातीपासून बनवणारी. बहुतेक अनुची बायकोपण असावी.

हुंबाबा - ॲनिमेशन लागेल, पण तोपर्यंत खली चालेल.
राक्षस.

उत्नापिष्टीम - रसेल क्रो.
एकुलता एक अमर मनुष्य. नोहासदृश कामगिरी बजावलेला. रसेलला नोहाचे काम करायचा अनुभवही आहे. त्याने टाईपकास्टिंगच्या चिंतेने भूमिका नाकारली, तर त्याला क्रिकेटचा वास्ता देऊ.

उर्शानबी - इरफान खान.
उत्नापिष्टीमच्या घरी नेणारा नावडी.

अजून बरेच लोक आहेत, पण हे वरचे सगळे मुख्य. बाकी नवोदित कलाकार चालतील.

योSSSSSSSSSSSS 
या मनाच्या बसूनी थेअटरी, सहल करू या उरुकची
चला मुलांनो आज ऐकू या, गोष्ट गिल्गू आणि एंकिडूची

***

महत्त्वाच्या तळटिपा - 
१. ब्लॉगवरील पुढील लेख हे अनुवाद किंवा भाषांतर नाहीत. मला तर या दोघांच्यातला फरक काये तेसुद्धा माहीत नाही.
२. मला जसे आठवेल तशी मी गोष्ट लिहीत आहे. (अधेमधे कुठेतरी एखादा संदर्भ बघितला आहे, त्याची यादी शेवटी मिळेल.)
३. गोष्टीत छोट्यामोठ्या चुका असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी मूळ गोष्ट वाचावी. (एवढीच खाज असेल तर, असे कंसात लिहू इच्छितो.) 
४. आंग्लाळलेल्या मराठीचे संवर्धन व प्रसार यांबाबत प्रस्तुत लेखक खूप सिरिअस आहे - तुम्हांला हे पटत नसेल व इंग्लिश शब्द खड्यासारखे मधे आले तर कृपया सहन करा. मूग कितीही नीट निवडला, तरी खिचडी खाताना एखादा खडा येतो ना दाताखाली? म्हणून खिचडीला नावे ठेवायची का?
५. राउंड फिगर.

0 comments: