प्रकरण तीन - हुंबाबामर्दनाचा बेत

हुंबाबा, हुंबाबा, हुंबाबा हुईई

गिल्गमेश आणि एंकिडूची चांगली गट्टी जमते. एंकिडू राजपरिवारातील एक महत्त्वाचा सदस्य बनतो. एक दिवस गिल्गमेश एंकिडूला म्हणतो - भावा, आपण दोघे एकदा सिडारच्या जंगलात जाऊ या का? 

हे यडं डोक्यावर पडलंय का आज सकाळ-सकाळच टाकून आलंय, अशा नजरेने एंकिडू गिल्गमेशकडे पाहतो आणि म्हणतो - तुला असले काहीतरी आचरटासारखे का करायचे आहे? 

गिल्गमेश म्हणतो - अरे, काय सांगू तुला! सिडारच्या जंगलात जायची माझी खूप पूर्वीपासूनची इच्छा आहे. तिथे महाविकट हुंबाबा राक्षस राहतो. (आता हुंबाबादर्शन -) तो खूप दुष्ट आणि भीतिदायक आहे. मला त्याचे निर्दालन करायचे आहे. पण मला जंगलात जायचा रस्ता माहीत नाही. 

एंकिडूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो टिपे गाळू लागतो असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. 

तो म्हणतो - मित्रा, मी जेव्हा रानटी प्राण्यांबरोबर राहायचो, तेव्हा तिथे गेलो होतो. ते जंगल अवाढव्य पसरले आहे. (इथे काय-काय मापे दिली आहेत). हुंबाबा तर विचारूच नकोस. त्याची गर्जना म्हणजे धबधबा आणि मुखातून आग. श्वास म्हणजे साक्षात मृत्यू. त्याला एन्लिलनेच रक्षक म्हणून नेमले आहे - लोकांना घाबरवायला आणि वनसंपदा सुरक्षित ठेवायला. अरे पावट्या, आपण दोघे त्याच्यासमोर क्षणभरही टिकणार नाही. 

गिल्गमेश काही हट्ट सोडत नाही. एंकिडू त्याच्यासमोर परत हुंबाबादर्शन गातो.

एंकिडू काही ऐकत नाही म्हटल्यावर गिल्गमेश फिलॉसॉफी झाडायला लागतो - या धरतीवर देव सोडले, तर कोण अमर आहे? मर्त्य मानवाचे कर्तृत्व तरी काय? नुसतं जन्माला आलो, राज्य केलं, मेलो? तू मला रस्ता दाखव. जास्तीत जास्त काय होईल? मी त्याच्याशी युद्ध करताना मरेन. माझ्या पुढच्या पिढ्या अभिमानाने म्हणतील - कोण? गिल्गमेश? आमचे खापरपणजोबा ते. लय वांड होतं ते येड्या! हुंबाबाला भिडलं, मेलं खरं, पण फाईट देऊनच.

यानंतर तो एंकिडूला काही विचारतच नाही. थेट दोघांसाठी नवीन शस्त्रास्त्रे बनवायचे आदेश देतो लोकांना.

मग पुढे शस्त्रास्त्रदर्शन - कारागीर त्यांच्यासाठी महाजड, महाप्रचंड कुर्‍हाड, तलवार, पट्टा सगळे बनवायचे ठरवतात. प्रत्येक गोष्टीचे माप सामान्य माणसाला लागेल त्याच्या तिप्पट-चौपट. यात काही अतिशयोक्ती नसावी असे मला वाटते. सचिनचीच बॅटच दीड किलोची होती. मग गिल्गमेशच्या कुर्‍हाडीचं काय घेऊन बसलास लेका?
*

ज्येष्ठांशी सल्लामसलत

ही वार्ता हळूहळू राज्यात सर्वत्र पसरली. शहरातील मुख्यद्वारापाशी एक सभा घेण्यात आली. थोडक्यात, दिवान-ए-आम दरबार भरला. गिल्गमेशने जनतेला आपला बेत सांगितला. माझे कसे नाव होईल, मरावे परी कीर्तीरूपी उरावे वगैरे फंडे दिले. नंतर आशादायक चित्र दाखवले - आपल्या पुढच्या दिवाळीला मी जिंकूनच आलेलो असेन वगैरे.

एंकिडू चांगला चिवट निघाला - त्याने परत हुंबाबादर्शन गायले. आणि तुम्हीतरी याला समजवा यार, असे लोकांना म्हणाला. ज्येष्ठ लोकांना एंकिडूचे म्हणणे आधीपासूनच पटत होते. ते गिल्गमेशला म्हणाले -  तू एक काबिल, नौजवान राजा आहेस. सगळं कसं सुरळीत सुरू आहे. आपल्या राज्याला या एंकिडूच्या रूपाने एक नवीन कार्यकर्तापण चांगला मिळाला आहे. असं सगळं भरलेलं पंचपक्वान्नांचं ताट समोर असताना ते सोडून कुठे जंगलातल्या कंदमुळांच्या मागे भटकतोस? आम्ही सिडार आणि हुंबाबाविषयी बरंच काही भयानक ऐकून आहोत. शिवाय एंकिडूपण सांगतोच आहे.

असे बराच वेळ चर्वितचर्वण सुरू राहिले. मग गिल्गमेशने सभा आटोपती घेतली. अंतिम निर्णय सांगितला. एंकिडूदर्शन गायले. त्याच्या अनुपस्थितीत एका सिनिअर सरदाराला कारभारी नेमले. ज्येष्ठांनी नाईलाजाने त्याला होकार आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी एंकिडूला गिल्गमेशची काळजी घ्यायला सांगितले.

सगळे सेट झाल्यानंतर गिल्गमेशने लोकांना बोलावले आणि आपल्या कुलदैवताला शमाशला (सूर्यदेवाला) वंदन केले. म्हणाला - हे शमाशदेवा, मी तुझी करुणा भाकतो. हाती घेतलेले कार्य कठीण आहे याची जाणीव आहे मला. तू भविष्यातल्या गिल्गमेशची काळजी घे. (काय सुंदर वाक्य आहे बघा.) आणि बरेच काय-काय म्हणाला - बाकी सगळ्या देवांनापण सांगून ठेव वगैरे म्हणाला शमाशला. (तुम्ही जर Devil is in the details विचारसरणीचे असाल, तर मूळ कथाच वाचा कशी.)

असा हा सामूहिक प्रार्थनासमारंभ झाल्यावर ज्येष्ठांनी परत सल्ला दिला - प्रवासात एंकिडूचे ऐक. त्याला रस्ता आणि तो भाग माहीत आहे. तो तुझे रक्षण करण्यास समर्थ तर आहेच. एंकिडू पुढे चालेल. तू त्याच्या मागोमाग राहा. शिवाय लुगालबंद आणि शमाश तुला मार्गदर्शन करतीलच. वाटेत काही अडथळे आले, तर त्यांची करुणा भाका.

मग त्यांनी त्याला एका विधीची आठवण करून दिली - रात्री जिथे मुक्काम करशील, तिथे झोपायच्या आधी एक खड्डा खण. तुझ्याकडचे शुद्ध थंड पाणी त्यात ओत आणि लुगालबंदाय शीतजलं समर्पयामि, शमाशदेवाय शीतजलं समर्पयामि असे म्हण.
गिल्गमेश ओके म्हणून दरबार बरखास्त करतो.
*

निन्सुनचे आशीर्वाद

लांबड संपली नाही अजून. 

गिल्गमेश आणि एंकिडू तिथून देवी निन्सुनच्या महालात जातात. वाटेत गिल्गमेश निन्सुनदर्शन गातो. तिथे जाऊन निन्सुनला वंदन करून सगळ्या ताज्या घडामोडी सांगतो. बोलता बोलता एक नवीन गोष्ट कळते. (म्हणजे गिल्गमेश निन्सुनशी बोलताना आपल्याला एक नवीन गोष्ट कळते.) शमाशदेवाला हा सिडार जंगल प्रकार पूर्वीपासूनच आवडत नाही. गिल्गमेश म्हणतो - ज्या-ज्या गोष्टींचा शमाशदेव तिरस्कार करतो, त्या-त्या सर्व गोष्टी मी नष्ट करून येईन. देवी निन्सुन काही न बोलता आपल्या कक्षात जाते. शुचिर्भूत होते, सुंदर असा पांढराशुभ्र पायघोळ झगा घालते, आपल्या स्तनांवर रुळेल अशी सुंदर माळ घालते. मस्तकी रत्नजडित मुकुट. अशी पूजेच्या पोषाखात तयार होऊन महालाच्या छतावर जाते. तिथे शमाशदेवाकडे बघून सुवासिक सायकल अगरबत्ती आणि गंधे सुगंधी यांचा धूप जाळते. वेगवेगळे स्तोत्रमंत्र, शमाशदर्शन, शमाशसहस्त्रनाम वगैरे म्हणते. बर्‍याच वेळाने हे सगळे विधी झाल्यावर ती शमाशला म्हणते - मला तू हा असा आततायी मुलगा दिला आहेस - चंचल कारटं आहे एकदम. त्याच्या डोक्यात हे काय नवीन खूळ घातलं आहेस तू, शमाशा? (इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की निन्सुन ही देवी आहे, ती शमाशशी अशा भाषेत बोलू शकते. ते दोघे पिअर्स आहेत (साबण नव्हे, सहकारी)). पुढे म्हणते - त्याचे कार्य सिद्धीस जावो, तो सुखरूप परत येईपर्यंत त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे हां. शिवाय सांगते - आया, तुझी पत्नी, तुला गिल्गमेशची काळजी घ्यायची आठवण करत राहीलच. मग परत शंभरेक मंत्र म्हणते.

त्यानंतर ती एंकिडूला छतावर बोलावते. त्याला म्हणते - हे बलशाली एंकिडव्या, तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस; पण गिल्गमेशच्या सर्व मित्रांना आणि सेवकांना मी ज्या प्रकारे दत्तक घेतले आहे, तसेच आज मी तुलाही दत्तक घेत आहे. असे म्हणून ती त्याला खानदानी गंडा बांधते. आजपासून तू गिल्गमेशचा ब्रदर फ्रॉम अनादर मदर. यो.

मला हे निन्सुनच एंकिडूप्रेम सोयिस्कर वाटते. गांधारीला कर्णाबद्दल कसे वाटत असेल, तसेच - कोण कुठून आलाय देव जाणे, पण शूर आहे. आपल्या मुलाबरोबर राहून त्याची काळजी घेतो ते बरंच आहे.
*

प्रस्थान

गिल्गमेश आणि एंकिडू निघायला तयार होऊन मुख्यद्वारापाशी येतात. येथे एंकिडूचे वर्तन खूपच स्पृहणीय व प्रेरणादायक आहे. सर्वांनी त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे. 

तो गिल्गमेशला म्हणतो - आता तू हुंबाबानिर्दालन करायचे नक्की केलेच आहेस, तर चल. मला त्या घनदाट जंगलातील रस्ता व्यवस्थित माहीत आहे. हुंबाबाचे वास्तव्य ज्या भागात आहे, आपण थेट तिथेच पोहोचू. आता मनातल्या सगळ्या शंकाकुशंका बाजूला ठेवून धैर्याने माझ्याबरोबर चल. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत तुझ्या मक्याच्या-कणसातील-तुर्‍यासारख्या-भुरुभुरु-उडणार्‍या-एका-केसालाही मी धक्का लागू देणार नाही.

हे ऐकून निन्सुन आणि ज्येष्ठ लोक खूश. सर्व लोक तेच तेच परत बोलून यांना टाटा करतात. हुश्श. दुसर्‍या दिवशी उरुक टाईम्समधे मुख्य पानावर बातमी - हुंबाबा होणार हुतात्मा?

हुंबाबा, हुंबाबा, हुंबाबा हूर्र, हूर्र.
***

१.  सिडारला आपण देवदार म्हणतो. पण लेबोनीज सिडार म्हणजे देवदार नव्हे. आधीच पृथ्वीची जैवविविधता धोक्यात आहे. उगाच आपण काहीतरी चुकीचे लिहून वैश्विक पर्यावरणिक गोंधळ नको घालायला. म्हणून इथे सिडारच शब्द वापरला जाईल.
२. अकितू (नववर्ष) नावाच्या सणापर्यंत मी परत येईन, असे गिल्गमेश म्हणतो.

0 comments: