प्रकरण दहा - उत्नापिष्टीमनिवासला आगमन

सिदुरीची भेट

वन्य प्राण्यांचे कच्चे मांस खाणारा, त्यांचेच कातडे वस्त्र म्हणून घेणारा गिल्गमेश बघून शमाशदेवाला गहिवरून आले. तो गिल्गमेश समोर प्रकट झाला आणि म्हणाला - अरे गिल्गमेश, कसलं हे खूळ घेतलं आहेस डोक्यात. जोपर्यंत मी आकाशात आहे तोपर्यंत कोणीच मनुष्य अमर होवू शकणार नाही.  उत्नापिष्टीमची गोष्ट निराळी होती, तो काळही वेगळा होता आणि नियमही वेगळे होते. तू मिळालेले आयुष्य आनंदाने जग ना यार, का वणवण भटकतोस उगा?
गिल्गमेश म्हणला - कदापि नाही देवा, एवढे लांबवर प्रवास करुन मी माघारी फिरु? मला उत्नापिष्टीमची गाठ तरी घेवूदेत, बघूया ना काही मार्ग निघतो का ते?
शमाश म्हणाला ठीके, त्याने गिल्गमेशला सिदुरी नावाच्या एका देवतेची माहिती दिली आणि तिचा शोध घ्यायला सांगितलं. सिदुरी पुढचा रस्ता सांगू शकणार होती. गिल्गमेश भटकत भटकत, फायनली समुद्रालगतच्या एका झोपडीपाशी आला. तिथे मदिरादेवी सिदुरी रहायची. जिथे सागरा नदी मिळते अशा ठिकाणी बसून एका हाती जग घेवून देवांसाठी दारु तयार करणे हे तिचे मुख्य काम. तिने लांबूनच गिल्गमेशला पाहिले - कुत्र्याचे कातडे पांघरलेले, दाढी+केस वाढलेले, हातात जाडजूड काठी अशा अवतारातील मनुष्य बघून तिची टरकली. तिने विचार केला, हा रानटी मनुष्य इकडे कशाला येत असावा, माझी काही खैर नाही, ह्याचा आवेश बघून वाटते आहे की हा गडी आज माझा मुडदाच पाडणार. ती पटकन घरात गेली आणि तिने दार लावले, वरचा बोल्टपण लावला. खिडक्याबिडक्या सगळ्या लावून टाकल्या, पडदे सारले. गिल्गमेशने तिला दार बंद करताना पाहिले. म्हणजे, टू बी स्पेसिफीक - गिल्गमेशने तिला, त्याला पाहून दार बंद करताना पाहिले. तो तिथे पोहोचला आणि ओरडला - ओ, तुम्हाला माहिते का, मी मनात आणलं तर एका बुक्कीत हे दार तोडेन आणि आत घुसेन. मग तिने विचारले, कोण तू, काय काम आहे, मी खूप घाबरले आहे तुला. गिल्गमेश म्हणतो - मी गिल्गमेश, हुंबाबारी, रेडारिपू, एंकिडूमित्र, निन्सुनपुत्र एट्सेट्रा. 
सिदुरी म्हणाली - अय्या, तू आहेस गिल्गमेश, मग असा का तुझा वेश? कमरेला कातडं, डोक्याला पोतडं? डोळे असे सुजलेले, चेहरा का पडलेला? 
गिल्गमेशने जरा दमाने घेतलं आणि सगळी माहिती सांगितली - असाअसा माझा जिगरी यार होता, आम्ही लय दंगा घालायचो, सगळा फ्लॅशबॅक. मग आता एंक्या मेला आणि मी दु:खात. मी त्याचे शव सहा दिवस सात रात्री ठेवलं, पार त्याच्या नाकातून अळ्या येईपर्यंत. माझे पण असे हाल होऊ नयेत म्हणून मी असा फिरतोय, मला उत्नापिष्टीमकडे जायचा रस्ता सांग ना, प्लीज.
सिदुरीदेवी त्याला समजावयाचा प्रयत्न करते - अरे दोनतृतीयांश देवा, मनुष्याला देवाने बनवतानाच मरणपण दिले आहे, ते काही कुणाला टाळता येत नाही बाबा. तू राजा आहेस, भरपेट खा, भारी कपडे घालून पार्ट्या कर, पोरीबिरी फिरव, पोरीबिरींच्यात पण फिरव, छान एखादीशी लग्न करुन वारसबिरस दे राज्याला. एन्जॉयमाडी यार. जिले अपनी जिंदगी. तू अमरबिमर काही होणार नाहीस, पाहिजे तर तुला देवांसाठी बनविलेली दारु देते कपभर. ती पिवून आल्या पावली माघारी जा.
गिल्गमेश वैतागून म्हणाला - कितीदा सगळ्यांना तेचतेच सांगायचे यार, (मग, आम्हाला कसं होत असेल लेका तेचतेच वाचताना?). माझं दु:ख कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यावर एकच उपाय आहे - अमरत्व आणि ते मी मिळवणारच.
सिदुरी मग म्हणाली - ठीके, असाच कडंकडंन जंगलातून त्या समुद्रापाशी जा, एका कोपर्‍यात तुला उर्शानबी महाशय दिसतील. त्यांच्याकडे त्यांचे वल्हे आणि एक बोट असेल. त्याला तू जर पटवलस तर तो तुला बोटीतून मृत्यूसमुद्र पार करुन देईल. (वैतरणी नदी सारखा प्रकार.) नाही जमलं तर आलास तसा परत ये, उरुकला जायला शॉर्टकट सांगेन.
*

उर्शानबी नावाडी.

रस्ता कळाल्या-कळाल्या गिल्गमेश तीरासारखा धावत सुटला. असा पळत येणारा रानटी प्राणी पाहून उर्शानबीला वाटलं, हा पिसाळलेला माणूस आहे, चावणार आपल्याला आता. मग दोघांची लघुमध्यम मारामारी-कम-बाचाबाची झाली. परत तेच सगळं, उर्शानबी म्हणाला - तू कोणेस? गिल्गमेशने आपलं रडगाणं सांगितलं - काय काम आहे ते सांगितलं आणि म्हणाला, नेशील का मला या पाण्याच्या पल्याड, उत्नापिष्टीम राहतो तिथे.
उर्शानबी म्हणाला - हुशार माणासा, मी तुला आनंदाने उत्नापिष्टीमकडे नेलं असतं, पण मगाशी रागाच्या भरात तू माझ्या होडीचे शीड आणि वल्हे तोडलेस लेका. गिल्गमेश हिरमुसतो आणि म्हणातो - काहीच उपाय नाही का, उ:शापासारखं बघा ना काहीतरी करता आलं तरं, एखादी शांतबिंत करु वाटल्यास. उर्शानबी म्हणाला - चांगल्या घरचा वाटतो आहेस म्हणून तुला उपाय सांगतो, समोरच्या जंगलात जा. सव्वीस बांबू काप. एकाच मापचे एकदम मस्त. त्यांच्या एका टोकाला थोडसं डांबर लाव. तसं केलंस तर आपण त्यांना नाव पुढे हाकायला म्हणून वापरु.
गिल्गमेशला काय, असलं कापाकापी-बिपी आवडीचंच काम मिळालं. त्याने दोन मिनीटात सव्वीस बांबू तयार केले. मग लागलीच ते बांबू नावेत लादून निघाले दोघे. उर्शानबीला रस्ता माहित होता त्याने गिल्गमेशला पहिला बांबू घ्यायला सांगितला, त्याचा वापर करुन नाव थोडी पुढे गेली. मग थोड्या वेळाने, पहिला बांबू खराब झाला, दुसरा काढला. होडी चालवायला एवढा उत्साही कार्यकर्ता मिळाल्याने उर्शानबी चील मारत होता, अधेमधे फक्त - हं, आता पहिला बांबू टाकून, दुसरा बांबू घ्या. अशा सूचना करायच्या. त्या पाण्याला हात लावणे अलाउड नव्हते, त्याला हात लावला की खेळ संपला. टचला तो संपला. ऐनवेळची गडबड अशी की, उर्शानबीचा हिशोब जरा चुकला - बांबू संपले पण किनारा काही आला नव्हता. गरज गिल्गमेशला होती, त्याने बिचार्‍याने कमरेची कापडं काढून शीड म्हणून लावली(गरजवंताला बक्कल नसते), अंगावरचं कातडं हाताला गुंडाळून पाणी मागे सारू लागला.
अस वल्हव दरवल्हव करता करता आला एकदाचा किनारा आणि दूर किनार्‍यावर हिज मॅजेस्टी थोरले श्रीमंत उत्नापिष्टीम उभे होते.

इथे नेहमीप्रमाणे, दोघे (गिल्गमेश आणि उर्शानबी - एंकिडू नाही हो आपुला ) होडीतून किनार्‍याजवळ येत आहेत, असा पाठमोरा लॉंग-वाईड शॉट घ्यावा. लॉंग-वाईड शॉट संपल्यावर, उत्नापिष्टीमच्या डोळ्यांवर क्लोजअप मारावा. स्क्रीनभर त्याचे डोळे फक्त.
*

उत्नापिष्टीमशी ओळख

उत्नापिष्टीम किनार्‍यावरुन बघत होता, कोण आहे बरं हे उर्शानबी बरोबर,आणि उर्शानबीच्या बोटीच्या ही काय अवस्था? एवढ्यात उर्शानबीची आणि गिल्गमेश किनार्‍याला पोहोचलेच. उर्शानबीने दोघांना थोडी प्रायव्हसी दिली आणि बेटावर एक चक्कर मारायला गेला. गिल्गमेशने मुद्द्यलाच हात घातला - मी गिल्गमेश, दोन तृतीयांश देव, उरुकचा राजा, वगैरे सगळे गिल्गमेशदर्शन. माझी ही अवस्था आपण बघतच आहात, मी खूप भटकलो आहे, तरसबिरस मारुन खाल्लय, चोवीस तास माशू पर्वताच्या खिंडीतून चाललो आहे. मला तुमच्यासारखे  अमर व्हायचे आहे, काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करा.
उत्नापिष्टीम नेहमीचे सगळे ज्ञान देतो - मनुष्यजीवनाची परिणिती मृत्यूतच होती, त्याला काही पर्याय नाही मित्रा. सुंदरातली सुंदर तरुणी आणि चांगला गब्रू जवान गडी, दोघेही एकनाएक दिवस मरणारच. आपण कधी असे घर बांधतो का, की जे कायम टिकेल, काही वर्षांनी का होईना ते मोडावेच लागते ना? सगळे करार शाश्वत असतात का सांग बरे? अरे मरण हे निद्रेसारखंच आहे. तू घाबरु नकोस, आहे तो वेळ सत्कारणी लाव त्यापेक्षा.
असे बरेच त्या कालानुरुप तत्वज्ञान झाडले उत्नापिष्टीमने, त्यालाही बर्‍याच दिवसांनी नवीन श्रोता मिळाला होता.
***
१. हे माझ्या मनाचं आहे. तशा प्रत्येक ठिकाणी तळटीपा नाहीत की हे हे, माझ्य मनाचं. जिला खरच प्रामाणिक इच्छा असेल ती व्यक्ती खरी गोष्ट वाचेल.
२. ही आपली ओळख आहे मित्रहो, टॅरँटिनोचा ट्रंक शॉट असतो ना तशी ओळख. सिग्नेचर.

0 comments: