प्रकरण सात - एंकिडूला पडलेले दु:स्वप्न

देवांची सभा

रात्री एंकिडूला स्वप्न पडले मग नंतर त्याचा डोळा काही लागलाच नाही, पहाटे पहाटेच तो गिल्गमेशकडे गेला. गिल्गमेशला म्हणाला - मित्रा, मला काल रात्री भयानक स्वप्न पडले. सर्व देवांची सभा भरली होती, देवाधिदेव अनु, त्याचा पुत्र - विद्येची देवता एन्लिल, एन्लिलचा पुत्र एन्की, सूर्यदेव शमाश हे सर्व उपस्थित होते. देवाधिदेव अनु म्हणाले - या दोघांनी घातलेला धुडगूस आपण सगळ्यांनी पाहिला आहे, त्यांनी निसर्गरक्षक हुंबाबाला कारण नसताना मारले, नंतर स्वर्गातील रेड्यालाही मारले. याची शिक्षा म्हणून त्या दोघांपैकी एकाला देहदंड दिलाच पाहिजे. 
एन्लिल लगेच म्हणाला - एंकिडू मेला पाहिजे, गिल्गमेश मेला नाही तरी चालेल.
सूर्यदेव कडाडला - एन्लिलदेवा, हुंबाबाला मारण्याच्या कटात तूही सामिल होतास, आणि आता तू निरपराध एंकिडूला शिक्षा देवू म्हणत आहेस? रेड्याचं म्हणाल तर, त्याला मारण्याशिवाय तर दुसरा काही पर्यायच नव्हता दोघांकडे. 
एन्लिल शमाशला म्हणाला - तू सदासर्वदा त्यांच्याबरोबर असतोस म्हणून काही त्यांची कृत्ये योग्य ठरत नाहीत.
एंकिडूने हे सगळे सांगितले आणि तो रडू लागला. एंकिडू एकदम निस्तेज झाला.
.
*

एंकिडूच्या अखेरच्या घटका

गिल्गमेशपण रडू लागला, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, घाबरू नकोस, आपण बघू काहितरी अशी संदिग्ध आशा देवू लागला पण मनातून तो सुद्धा चांगलाच खचला होता. एंकिडू आठवून आठवून त्याच्या नशीबाला दोष देवू लागला. ताप डोक्यात गेल्यावर बोलतात तसं काय काय बरळू लागला -
१. त्याने बनविलेल्या सिडारच्या दाराचे लांबलचक वर्णन करुन म्हणाला - एवेतेवी मरायचे होते तर का मी बनवले ते दार.
२. मग शिकार्‍याची पाळी - तुझ्यामुळे सगळी सुरुवात झाली, तू उपाशी मरावास अशी मी शमाशकडे प्रार्थना करतो, तुझी भक्ती शमाश नाकारेल, तुला एकही शिकार मिळायला नको वगैरे वगैरे.
३. मग बिचारी शमात -  सुंदर शमात, तू आली नसतीस तर माझ्यावर आज ही वेळ आलीच नसती, किती सुखी होतो मी हरणांबरोबर. मी तुला शाप देतो, तुझे कोणा सभ्य माणसाशी लग्न होणार नाही, तू अतिनीच प्रतीची वेश्या म्हणून जगोस. तुझे सुंदर स्तन अतिकुरुप होवोत. तुझे घर उध्वस्त होवो, तुला उरुकच्या भर चौकात मरण येवो. वगैरे वगैरे.
शेवट शमाशदेव गरजतो - अरे एंकिडू, तुझ्यावर दारुणकरुण प्रसंग आला आहे हे मान्य, पण शमातला का उगाच शिव्याशाप देत आहेस तू? या सर्व प्रकरणात तिची काही चूक नाही. तिच्यामुळे तुला रतिसुख काय असते ते समजलं, माणूस म्हणून जगणं तिने शिकवलं तुला. गिल्गमेशसारखा जीवाला जीव देणारा मित्र तुला तिच्यामुळेच मिळाला. तू मनुष्यप्राणी असल्याने तुला एकनाएक दिवस मरण हे येणारच होतं. हरणांबरोबर चरत असताना मेला असतास तर तुझा तुला पत्ता लागला नसता लेका. आता तुझ्यामागे गिल्गमेश, आख्खे उरुक शोक करेल.
एंकिडूलापण उमगते की शमातला दोष देवून काही उपयोग नाही. मग तो सगळे बोलणे अनडू करतो, आणि खूप काय काय शुभेच्छांचा वर्षाव करतो. त्याचे सार म्हणजे - तुला गडगंज, गर्भश्रीमंत नवरा मिळो. दुधोनहाओ, फलोफुलो, तुला त्रास देणार्‍यांची वाट लागो.
असं सगळं घडल्यावर एंकिडू परत आपल्या महालात परत जातो. तो जरा तापला असतो, अन्नपाणी काही ग्रहण न करताच तो निजतो. गिल्गमेशला चैन पडत नसते, तो आपली बॅग भरुन एंकिडूच्या महालात पोचतो आणि त्याच्या उशाशी बसतो.
रात्री एंकिडू परत जागा होत व गिल्गमेशला म्हणतो - मित्रा, आता मला मृत्यूची चाहूल लागली आहे. मी स्वप्नात पाहिले की, मी स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधे उभा आहे आणि मृत्यूदेवता झू माझ्याकडे टक लावून बघत होता. हळूहळू तो आला त्याने मला त्याच्यात सामावून घेतले. मी पण झूच झालो. (मॅट्रिक्सची टिम बोलवावी लागेल या स्पेशल इफेक्टसाठी) झू मला यमलोकात घेवून गेला. तिथे सगळे सामान्य लोक, राजेमहाराजे, सैनिक, व्यापारी नम्रपणे उभे होते. एन्लिलची जुळी मुलं सगळ्यांना जेवायला वाढत होते. मग शंभरेक राजांचं वर्णन आहे. शेवट तिथे राणी एर्श्किग माझ्याजवळ आली आणि तिने सेवकांना विचारले याला कोणी आणले. एका सेविकेने तिच्या हातातील लांबलचक कागदाच्या गुंडाळीतूने काय काय वाचायला सुरू केले.

पापपुण्याचा हिशोब, का मांडता आता?
पाप काय, पुण्य काय,
नीती काय, अनिती काय,
कोणी सांगितले का मजला?
ना माय पाहिली मी,
ना बाप कधी दिसला,
भल्याबुर्‍याच्या बोधकथा
सांगाया कुठे लाभली आज्जी?

घेतली माती, फुंकला जीव
माझ्या हृदयाचा कधी घेतला का हो ठाव?

दु:ख नाही वेदनांचे
दोष माझ्या प्राक्तनाचा,

घ्यायचे होते सगळे काढून
तर ताट का दिले पक्वान्न वाढून?

अशी ही स्वत:हूनच अचानक बाहेर पडलेली बोर्बालीश कविता झाल्यावर आपण परत मूळ गोष्टीकडे वळूया. 

गिल्गमेशला आपल्या स्वप्नाचा वृत्तांत सांगता सांगता, एंकिडूला ग्लानी आली. त्याचा ताप वाढला तोंड हलत होते पण त्याचे बोलणे काही ऐकू येत नव्हते. निराश गिल्गमेश उशाशी बसून होता. दिवसेंदिवस एकिडूची प्रकृती ढासळतच होती. बारा दिवसांनी, अचानक एंकिडू बोलला. तो म्हणाला - मित्रा, मी जातो आता, माझ्या नशिबी काही वीरमरण नाही त्यामुळे आता मला मरणापश्चात भोग हे भोगावे लागतील.

बिचारा एंकिडू, मला मनापासून वाईट वाटते आहे.
***

१.
गिल्गमेशच्या सिनेमातील हे मध्यांतर आहे. या प्रकरणापासून पुढे गिल्गमेशच्या कथेतील साहस, खोडकरपणा संपलेला आहे. भ्रमणपर्वात परत थोडेफार साहस आहे पण एंकिडूच्या मृत्यूने कथेवर एक प्रकारचे किटण चढते, मळभ दाटते. या ढगांना चंदेरी झालर काय चंदेरी रफूसुद्धा नाही. खूपच दु:खी. एंकिडू आल्यानेच गिल्गमेशच्या आयुष्यात बदल घडला होता, एंकिडू नसता तर हुंबाबामर्दन पण नसतं आणि पुढची सगळी भानगडपण नसती. मी अशा पॉईंटला आहे की कधीपण हे लिखाण थांबवू शकतो. एंकिडूचे हाल माझ्याच्याने सांगवत नाहीत. असं दु:खी लिहायला मला आवडत नाही.
गिल्गमेशचं दु:ख माझ्यापर्यंत सुखरुप पोचलं आहे. दु:खात बरेच क्लिशे असतात. पण क्लिशेंवर तरी केवळ क्लिशे आहेत म्हणून का अन्याय करावा? दुसर्‍याचं दु:ख आपल्याला नेहमी कळतचं असं नाही. एखाद्या व्यक्तिच्या आयुष्यात त्याची दुखरी नस कुठली हे कळणं भयंकर अवघड आहे. बरेचदा लाख विदारक घटनांना साक्षी ठरलेला, सामोरे गेलेला मनुष्य त्यांविषयी तितकासा भावुक नसतो. पण एखादीच छोटीशी घटना जी दुसर्‍याच्या खिजगिणतीतही नसते, ती मात्र त्याला आयुष्यभर सतावते. हे सतावणे म्हणजे दु:ख असेल का? असेल की. आप्तस्वकिय मेले, घर जळालं, नोकरी गेली, कुणी प्रचंड धुलाई केली, कुठल्याही प्रकारचा जहरी अन्याय झाला, किंवा स्वत:कडूनच यातील काही घडलं, तर त्याला आपण ढोबळमानाने दु:ख मानू, पण प्रत्येक मनुष्य मानेलच असं नाही. त्रास अडचण हे दु:खच असतं. 
दुसर्‍याचे दु:ख आपल्याला समजणे एक भाग, परत ते टोचणे हा एक भाग. बरेचदा पुस्तकात विषद करुन सांगितलेली दु:ख आपल्याला समजून घेता येत नाहीत तर खर्‍या व्यक्तिंच काय? आपापल्या विचार आणि प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भिडतात. पण विश्वाचं हे जडणघडण वैविध्य जितक्या लवकर ध्यानात येईल तितकं चांगलं. दु:खाबाबतही आणि एरवीही. कोसला न आवडणार्‍यांना त्यातलं भरुन राहिलेलं आणि भव्यातिसामान्य दु:ख दिसंतच नाही का दिसूनसुद्धा ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही याचे उत्तर देव जाणे. मनू जाणे तर नियतीच्या खेळाचा एक भाग, कोणी अशा घटनेसाठी कितीही तयार नाही म्हणाला तरी कुमारवयापासूनच प्रत्येकाला, प्रत्येक जण कधी ना कधी मरणारच आहे हे माहित असतंच. मनू गेली, खानेसुमारी वाचली वगैरे डोळ्यात पाणी आणायला ठीके. दोन नाही  तीन वर्षांनी तर ते दु:ख थोडं बोथट होणारच होतं. पण शेवटांच काय, हे आपल्याला असेही खुंटीला बांधणार तसेही, मग आपणहूनच या कटात सामील होवू. आयुष्यभरासाठी. डेंजर. कटात सामील झालेल्यांनाच समजेल हे.
भयाची जननी दु:खच. किंबहुना दु:खाची केवळ शक्यताच भय जन्माला घालते. हे तर अजून भयानक. रोजच्या जीवनातील मनुष्यकृतींच्या उद्देशाचे ढोबळ वर्गीकरण करावयाचे म्हणले तर, भय, सवय आणि प्रेरणा असे गट पडतील. कलाबिला सगळे प्रेरणेत. बाकी म्हणजे सवय किंवा भय. सवयीची जननी परत दु:खच. रोज दात घासले नाहीत तर ते किडतील, मग गोड खाता येणार नाही, डॉक्टरांवारी पैसे जातील, उपचारासाठी वेळ काढणे आले, किती त्रास. त्यापेक्षा सवय लावलेली बरी. असले दु:ख प्रतवारीच्या मनोर्‍यात एकदम खालच्या भागात. पण मनोराच तो, खालच्या भागातली दु:खांची प्रत कमी पण संख्या अगणित.
सार्वत्रिक, सार्वकालिक दु:खावर एकच उपाय आहे, अनपेक्षित सामूहीक मरण, एकाच क्षणात सर्वांना डायनासोरियन मृत्यू. मग तुलना नाही आणि दु:ख नाही. आख्खा मनोरा एकाच क्षणात कोसळला पाहिजे.
गिल्गमेशच्या डोळ्यांदेखत एंकिडूचे मरणे त्याला जाणीव करुन देते की, आपणही असेच मरणार. गिल्गमेशला आपण एक दिवस मरणार आहोत याची जाण तर पूर्वीही असतेच. हुंबाबाला मारायला जाताना तो सर्वांना समजावत असतो की - नाहीतरी एकनाएक दिवस मरायचेच आहे तर काहितरी महान करुन मरु. पण एंकिडूचे मरण मात्र त्याला खाडकन मुस्काटात मारुन सांगते की मरण समोर उभे ठाकले नसताना मी एवीतेवी मरणारच आहे असे म्हणणे किती निरर्थक आहे.
आवरा. यांना आवरा.
मनुष्याने त्याच्या प्रकृतिस्वभावाविरुद्ध काही करु नये पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा तोटा हा की माकडाच्या हाती कोलित असू शकते - होय.


0 comments: