प्रकरण दोन - गिल्गमेश आणि एंकिडू यांचे द्वंद्व

आणि एंकिडू माणसांत आला!

पिछले एपिसोड में आपने देखा, के कैसे शमात अपने जिस्म का इस्तेमाल कर के एंकिडू को इन्सानो में लाती है. या प्रकरणाची सुरुवात, मागील भागाची उजळणी करून होते. थोडेसे वेगळे वळण म्हणजे या वेळेला शमात एंकिडूला सांगते, की गिल्गमेश तुझा चांगला मित्र होऊ शकेल, तो तसा कदरदान माणूस आहे. (गिल्गमेशचे स्वप्न ऐकल्यावर निन्सुनने निरोपबिरोप दिला असेल तिला, काय सांगता येत नाही.)

शिवाय थोडासा कार्यक्रम बदलून ती म्हणते, एंकिडू सख्या, उरुकला जायच्या आधी आपण मेंढपाळांच्या वस्तीवर थोडे दिवस राहू. एंकिडूला ही कल्पना आवडते. माळावर जायच्या आधी शमात तिच्या कपड्यांचे दोन भाग करते - एक तिला, एक त्याला. मग ती त्याच्या हाताला धरून त्याला नीट मेंढपाळांच्या वस्तीवर आणते. सगळे मेंढपाळ त्याच्याभोवती जमतात. त्यांच्यातपण तीच चर्चा होते - हा ताराच आहे का काय, बिट्टू गिल्गमेशच जणू, कसले मक्याच्या कणसातल्या तुर्‍यासारखे भुरुभुरु उडणारे सोनेरी केस, काय पिळदार स्नायू... नेहमीचे सगळे. आपणच या पिष्टमय पदार्थाला माणसांत आणलेय या भावनेने शमातला एकदम भरून येते, मग नंतर प्राउड फीलिंगही येते.

मेंढपाळ त्याला जेवायला बोलावतात. तो त्यांच्यासोबत बसतो खरा, पण बिचार्‍याला समोर ठेवलेले अन्न कसे खावे हे कळतच नसते. आजपावेतो या गड्याने रानवनातल्या प्राण्यांचे डायरेक्ट तोंड लावूनच दूध प्यायलेले असते आणि नंतर कंद, फळेबिळे. हा टेबलावर ठेवलेला सगळा रेडीमेड प्रकार कसा खायचा ते त्याला समजत नाही. 

शमात एंकिडूसाठी खास प्रिमिअम ब्रेड आणि बिअर आणते. निरागस एंकिडू, सर्व मेंढपाळांकडे एकदा, मग अन्नाकडे एकदा, टक लावून बघतो. मग शेवट हताश नजरेने शमातकडे बघतो. कुत्र्याच्या पिल्लासारखे. शमात म्हणते - एंकिडू बाळा, हा ब्रेड आम्ही खात आहोत, तसा खा. ही बिअर पी - मनुष्यलोकांत असेच जीवन असते. शिवाय तुला वाढलेला ब्रेड आणि बिअर राजामहाराजांसाठी बनविलेली आहे. कृपया हे सगळ ग्रहण कर. तू नक्कीच यासाठी पात्र आहेस. मग कुठे तो सुरुवात करतो. थोड्याच अवधीत सगळ्या ब्रेडचा फडशा उडवतो. सात तांब्ये भरून बिअर हाणतो. (सांगायला गेले की हा मनुष्य टांगायलाच नेतो.) त्याला एकदम छान, मोकळे मोकळे वाटायला लागते. त्याचा चेहरा उजळतो. आपल्या अंगावरचे प्राण्यासारखे सगळे केस तो आपलाच हात फिरवून काढून टाकतो. अंगभर तेल चोपडतो.

त्याचे हे पालटलेले रूप पाहून शमात परत भाळते आणि ते दोघे परत एकदा रासक्रीडा करतात. (अशी काही ओळ गोष्टीत नाहीय. पण मला वाटते, या पॉइंटला एकदा सेक्सची गरज आहे. नट्या म्हणतात तसे - ही कथेची गरज आहे, असं कथाच ओरडून ओरडून सांगते आहे मला.)

तोवर शमातने त्याच्यासाठी नवीन मखमली, सिल्की कपड्यांची व्ययस्था केली असते. ते घातल्यावर तो अजूनच राजबिंडा दिसायला लागतो. आता मेंढपाळांच्या जीवनशैलीबाबत तो विचारणा करतो आणि थोडे दिवस त्यांच्यासारखे आयुष्य कंठायचे ठरवतो. 

तो त्यांचा पहारेकरी बनतो. वाघ-सिंह-लांडगा यांची एका हाताने शिकार करतो. सगळे मेंढपाळ खूश. त्यांना एंकिडूमुळे ढाराढूर-पंढरपूर झोपायला मिळते. एंकिडू गर्वाने घोषणा करतो - मी सगळ्यांत जास्त ताकदवान आहे, मी लांडग्यांना मारतो, सिहांना मारतो. माझ्यामुळे सगळे मेंढपाळ रात्री शांत झोपतात. मी या मेंढपाळांचा आणि या वस्तीचा राजा आहे.
*

चलो उरुक

एकदा असेच एंकिडू आणि शमात चिल् मारत बसले असतात व्हरांड्यात. तेव्हा त्यांना तिथून घाईगडबडीत निघालेला एक माणूस भेटतो. त्याला एंकिडू विचारतो, कुठे चालला आहेस मित्रा? हा मनुष्य वाटच बघत असतो, की कुणीतरी याला हा प्रश्न विचारावा. त्याच्या मनात एवढे मळभ दाटून आलेले असते की बस.

तो म्हणतो - मी लग्नाला चाललो आहे उरुकमधे. पण काय अर्थ आहे लग्नाला? तिथेही हा गिल्गमेश घुसणार. लिटरली. वर्षांनुवर्ष चालू असलेले सगळे रूढीनियम या राजाने बदलले आहेत. कुणाच्याही पत्नीवर पहिला हक्क त्याचा. लाज आणलीय. पूर्वीचं उरुक राहिलं नाही आता. पण आपल्यासारखा सामान्य माणूस काही करू शकतो का? देवांनाच हे मान्य आहे, तर काय? त्यांचा वरदहस्त लाभलाय गिल्गमेशला. त्यांच्या इच्छेशिवाय हे होऊच शकत नाही.

हे सर्व ऐकून एंकिडू रागाने लाल होतो. त्याच्या डोळ्यात अंगार दाटतो. तो जोरात एक जंगली आरोळी ठोकतो आणि म्हणतो - यापुढे असले फाजील लाड चालणार नाहीत गिल्गमेशचे. लय बिल झालं. मी आत्ताच्या आत्ता उच्च तटबंदी असलेल्या तुमच्या उरुकला जातो, गिल्गमेशला भेटतो आणि चांगला वठणीवर आणतो.
*

द्वंद्व + ही दोस्ती तुटायची नाय.

एंकिडू रागाच्या भरात ताडताड चालू लागतो. मागे मागे शमात. थोड्याच वेळात ते दोघे उरुकमध्ये पोचतात. उरुकचा जो काय मुख्य एम.जी. रोड असेल, तिथल्या एका चौकात त्याला बघून आजूबाजूचे सगळे उरुकवासीय जमा होतात. ते सगळे एंकिडूचे नेहमीप्रमाणे वर्णन करतात. (एंकिडूदर्शन असे स्तोत्रच लिहावे राव या वर्णनावर.) सगळे आनंदाने ओरडतात - नवीन हिरो आला! हा चांगला धडा शिकवेल गिल्गमेशला! टाळ्या, शिट्ट्या, फेटे!

शहराच्या तो मुख्य चौक क्रॉस केल्यावर पलीकडच्या एका महालातच गिल्गमेश व नववधू यांच्यासाठी शय्या सजवली जात असते. गिल्गमेश तिकडेच चालला असतो, पण एंकिडू त्याचा रस्ता अडवतो. मग गिल्गमेशदर्शन - मक्याच्या कणसातल्या तुर्‍यासारखे केसबिस.

मला जाऊ दे वगैरे काही विनंती गिल्गमेश करत नाही. पहले लात, फिर बात. दोघांचे तुंबळ द्वंद्व सुरू होते. वादळाला वादळ भिडते. आजूबाजूच्या परिसराची प्रचंड नासधूस. बरेच पवित्र दरवाजे तुटतात. मंडईतल्या सामानाची नासधूस - अंडी, टोमॅटोंचा चिखल. जणू दोन गवे एकमेशी युद्ध करत आहेत, असेच भीषण द्वंद्व सुरू असते. शेवट आपला एक पाय घट्ट रोवून गिल्गमेश एंकिडूला चीतपट करतो आणि जिंकतो.

गिल्गमेशचा राग शांत होतो. तो एंकिडूला सोडून उठतो.

एंकिडू त्याला म्हणतो - हे गिल्गमेशा, एकमेवाद्वितीय अशा गोमातेचा, देवी निन्सुनचा सुपुत्र तू. देवाधिदेव अनुच्या मुलाच्या - ज्ञानदेव एन्लिलच्या आज्ञेने तू राजा झालास. तुला कायमच उच्च दर्जाची वागणूक मिळाली आहे. तू महाबलशाली आहेस. तुझी ताकद तर माझ्यापेक्षाही जास्त आहे. मग तू असे का वागतोस बरे? तू साक्षात दोन तृतीयांश देव आहेस. तू या लोकांचा राजा आहेस ना? यांना असा त्रास देऊन तुला काय मिळते? अशा छोट्या गोष्टी करण्यासाठी तुझा जन्म नाही झाला. बंद कर तुझ्या या झवणावळी आणि याहीपेक्षा काही अलौकिक कर्तृत्व दाखव.

गिल्गमेशला एंकिडूचे म्हणणे पटते. तो म्हणतो - खरंय तुझं. मला पहिल्यांदाच कोणीतरी तोडीस तोड मिळाला आहे रे. 

यानंतर दोघे जिगरी दोस्त बनून गाणे म्हणतात - 

सात अजूबे इस दुनिया में, आठवी अपनी जोडी,
सात अजूबे इस दुनिया में, आठवी अपनी जोडी,
अरे, तोडेसे भाई टूटे ना, 
ये धरमवीर की जोडी
...
ही दोस्ती तुटायची नाय,
ही दोस्ती तुटायची नाय.

या परिच्छेदात मी बरेच काय काय मनाने टाकले आहे हे उघड आहे. पण गाणे माझे नाही हां. उगाच चोरीचा आळ नको.

या मारामारीवरून आणि नंतरच्या निकालावरून असे दिसून येते, की गिल्गमेश असे वागायचा, याचे कारण त्याची रग जिरली नव्हती. हार्मोनल प्रॉब्लेम टाईप असावा. एकदा रग जिरल्यावर तो एकदम बदलतो. म्हणजे असा स्पष्ट उल्लेख नाही. पण एकूण लक्षात येते, की त्याला आपली चूक उमगली आहे.

उरुकच्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्या हेतूने देवांकडे प्रार्थना केली, तो हेतू सफल होतो.
***

१. हे मका-कणीस-केस वर्णन इतक्यांदा आले आहे गोष्टीत, की हिची चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु गाणे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर ख्रिस हेम्सवर्थच येतो.
२. अशी एक थिअरी आहे, की खरेतर गिल्गमेश हरला नाही; तर असा शांत होऊन एंकिडूचा मित्र कसा बनेल? (पण गिल्गमेशचा स्वभाव कसा होता, ते आपल्याला माहीत आहे का?)
३. हा संवाद सुरू असताना मधेच दुसरे प्रकरण संपते आणि उर्वरित संवाद तिसर्‍या विटेवर आहे. आपण तो याच प्रकरणात बघू.

0 comments: