प्रकरण नऊ - गिल्गमेशचा अमरत्वाचा ध्यास

मै अमर हूंगा

एंकिडूच्या अंत्यविधीनंतर गिल्गमेश, उरुकबाहेर पडला. कमरेला कुत्र्याचं कातडं, हातात एक काठी आणि डोळ्यात टिपं, अशा अवस्थेत तो रानोमाळ भटकू लागला. एंकिडू जन्मला त्या भागात तो काही दिवस राहिला. मग असेच निरुद्देश वाट फुटेल तसं भटकत होता. हळूहळू एंकिडूच्या मरणाच्या आठवणीची तीव्रता कमी झाली पण त्या घटनेने त्याच्या मनात एक नवीनच पिल्लू सोडलं - आयला, आपणपण असंच एक दिवस मरणार. आता काय करावं? एखादा कितीही शूरवीर, बलशाली असला तरी ते सगळ युद्धात, मर्त्य लोकांपुढे. एकदा मरण दारात उभं ठाकलं तर आपण काहीच करु शकत नाही. गिल्गमेशच्या मनात एकदम हेल्पलेसनेस दाटून आला.
आपण एंकिडूच्या बाबतीत काही करु शकलो नाही, पण स्वत: मात्र असे मरायचं नाही असा निश्चय तो करतो. उरुकचा राजा गिल्गमेश हा अमर होणारंच.
अमर होण्यासाठी विशेष मार्गदर्शनाची गरज असते, यासाठी अगदी योग्य व्यक्ती म्हणजे - सर उत्नापिष्टीम. गिल्गमेश उत्नापिष्टीमची भेट घ्यायचे ठवरतो. सो यू आस्क, हू एज धिस मिस्टर उत्नापिष्टीम? पुरातन काळी प्रलय आला होता तेव्हा त्यातून वाचलेला एकुलता एक मानवप्राणी. (अगदीच एकुलता नाही त्याची मिसेसपण आहे की). आणि गिल्गमेशच्या दृष्टीने पुरातन काली प्रलय आला होता म्हणजे अल्ट्रापुरातन काल झाला हा तर. उत्नापिष्टीम प्रलयाच्यावेळी तरला, इतकेच नाही तर देवांनी त्याला वर दिला आणि तो अमर झाला. अमर कसे व्हावे यावरचे २१ अपेक्षित, उत्नापिष्टीमकडे नाही मिळणार तर कुणाकडे मिळणार मग?
*

चलो उत्नापिष्टीमकडे

गिल्गमेशला जुजबी रस्ता माहित होता. म्हणजे मला मसूर गावाला जायचा साधारण रस्ता माहितेय, कराडला जातान उंब्रज फाट्यातून आत शिरायचं मग लोकांना विचारायचं. त्याच लेव्हलची माहिती गिल्गमेशला होती. गिल्गमेश प्रवास सुरु करतो. रात्री मोठ्या पर्वतांपाशी एक प्रवेशद्वार असते तिथे पोचतो, नेहमीप्रमाणे चांगलं स्वप्न पडूदे म्हणून एखादा विधी करतो. त्याला स्वप्न पडते की - एक मोठ्ठा पर्वत असतो आणि गिल्गमेश आपल्या कुर्‍हाडीने आणि खंजीराने पर्वत चक्काचूर करुन टाकतो. एवढं छान स्वप्न, पण अर्थ विचारायला आज शेजारी कुणी नाही. दैव. 
मजल दरमजल करीत तो माशू पर्वतापाशी पोचतो. माशू हा थोडाफार आपल्या मेरु पर्वताप्रमाणे आहे. तो एवढा उंच आहे की त्याचे शिखर स्वर्गात निघते डायरेक्ट. जॅक आणि पावट्याचा वेल गोष्टीतल्यासारखं. आणि त्याचा पाया थेट पाताळात आहे. सूर्य माशूतूनच उगवतो आणि माशूतच अस्तास जातो. (जवळपास सेम पिंच, आमचा मेरुभोवतीपण सूर्य फिरतोsss). तर ह्या माशूमधे जायला परवानगी लागते. एक विंचूमानव सपत्निक तिथे पहारा देतो. (स्कॉर्पिअन-मॅन, वृश्चिकमनुष्य) अर्थातच तो दिसायला भयावह आहे, डोळ्यात अंगार, हुंबाबासदृश वर्णन सगळे. 
गिल्गमेशने लांबून त्यांना पाहिले आणि प्रचंड घाबरला, पण पूर्वानुभव असल्याने त्याने परिस्थितीस धैर्याने सामोरे जायचे ठरविले. तो त्यांच्याजवळ गेला. गिल्गमेश काही बोलणार तेवढ्यात विंचूमानवच म्हणाला - अगं ए, बघितलं का, कोण आलंय? गिल्गमेश, दोन तृतीयांश देव, उर्वरीत मनुष्य. एवढ्या लांब काहून आलास रं गड्या? 
गिल्गमेशला एवढी वॉर्म ट्रीटमेंट अपेक्षित नव्हती. तो अडखळतच म्हणाला - सर मला उत्नापिष्टीमसाहेबांना भेटायचे आहे, ते आमचे पूर्वज आहेत. प्रलयातून यशस्वीरीत्या तरुन त्यांनी अमरत्व मिळवलं आहे. मला त्यांना भेटून जीवनमरणाविषयी सविस्तर चर्चा करायची आहे.
विंचूमानव फारच जेंटल निघाला, तो समजुतीच्या सुरात म्हणाला - अरे, आजपर्यंत एकाही मनुष्याने माशू पर्वत पार केला नाहीये. उत्नापिष्टीमनेसुद्धा नाही. माशू पार करायला चोवीस तास लागतात. टोटल बारा डबल तास लागतात. आत पूर्णवेळ गर्द अंधार आहे. भिन्नकाळोख. 
गिल्गमेश म्हणतो - काय व्हायचं ते होवू दे, मी पूर्ण तयारीनिशीच आलोय, वेदना, त्रास, थंडीवारापाऊस कशाचीही पर्वा नाही मला. गाणं म्हणत जाईन किंवा रडत जाईन पण मी जाईन. (गाणं म्हणलंच तर - इट्स द फायनल काउंटडाउन म्हणावं लागेल.)
विंचूमानव गिल्गमेशचा निर्धार बघून म्हणतो - जा मित्रा, दरवाजा उघडला आहे मी, सुखरुप पार कर पर्वत, माझ्या शुभेच्छा. किती क्यूट नं - जवळपास सोक्यूटंच.
गिल्गमेश आत गेला आणि तो सूर्यासारखं पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करु लागला.

        for(int i=0; i<12; i++)
        {
           i डबलतास सुरु होता;
            if(i<9)
            {
   मिट्ट काळोख होता, एक कणभरही, अगदी अणूरेणू लेव्हलचाही प्रकाश नव्हता;                
           गिल्गमेशला पुढचे, मागचे काहीही दिसत नव्हते, तो आपले एका रेषेत मार्गक्रमण करत होता;
            }
            else if(i == 9)
            {
            गिल्गमेशला, पहाटेच्या थंडगार वार्‍याची आल्हाददायक झुळूक जाणवली, तो सुखावला;
            }
            else if(i == 10)
            {
            गिल्गमेशला लवकरच पहाट होणार आहे आणि हा पर्वतप्रवास संपणार आहे असे जाणवू लागले;
              त्याला हुरुप आला;
            }
            else if(i ==11)
            {
              गिल्गमेशला अंधूकसा सूर्यप्रकाश दिसू लागला;
            }
        }

आता गिल्गमेश पर्वतराजीतून पूर्णपणे बाहेर पडला होता, चांगलच उजाडलं होतं आणि लख्ख सूर्यप्रकाशाने आसमंत भरुन गेला होता. मलाच भारी वाटतं आहे. 
दरीखोर्‍यातून वाहेsssss, एक प्रकाश प्रकाश, ओssवssहो, ओssवssहो
रानं जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
पुढचे गाना.कॉमवर ऐकून घ्यावे. मल्टीमिडिया ब्लॉग वगैरे फालतूपणा आपल्याला आवडत नाही.

पर्वतराजीतून बाहेर पडल्यावर समोर प्रचंड मोठे नंदनवन होते, तिथे झाडाझुडपांना विविध रत्ने लटकली होती, गिल्गमेशने कधी पाहिली नाहीत अशी फळे होती. दूर समोर विशाल निळाशार समुद्र होता. एकूणात आजूबाजूचा नजारा एकदम तिलिस्मी होता. चंद्रकांतामधे एक अशी गुप्त जागा आहे अय्यार तेजसिंगची, तिथे तो लोकांना कैद करुन ठेवतो, एकदम नयनरम्य जागा. एकदम तशाच ठिकाणी गिल्गमेश पोचला होता.
आपलं प्रकरण इथे संपते आहे, नयनरम्य जागेचे वर्णन कल्पून तुम्ही विसरला असाल पण मी विसरलो नाहीये - आपला प्रिय एंकिडू मेला आहे लोकहो.
***

१. गिल्गमेशचा निर्धार - खरेतर गिल्गमे’शा’चा निर्धार असे लिहीले पाहिजे का? पण गिल्गमेशाचा हा शब्द मलाच वाचवत नाही, अजीर्ण मराठी.

0 comments: